तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल आणि ही आजवरची तुमची पहिलीच गाडी असेल तर तुम्हांला कार विमा तुलनेने जास्त भरावा लागू शकतो. परंतु कार विम्याचे हप्ते वाचवायचे असतील आणि स्वतःचा देखील विमा त्यात करून घ्यायचा असेल तर तसा पर्याय देखील उपलब्ध आहे.कार विम्याचा दुहेरी फायदा मिळवायचा असेल तर या लेखात दिलेली माहिती सविस्तर वाचा.
ड्रायव्हिंग अनुभव असतो महत्वाचा
जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच गाडी खरेदी केलेली असते आणि तुमचा आयुष्यातला जेव्हा पहिलाच कार विमा असतो तेव्हा विमा कंपनीसाठी तुम्ही अनुनभवी आहात. म्हणजेच तुमच्याकडून गाडी चालवताना चुका होण्याच्या शक्यता अधिक आहेत. तुमच्याकडून गाडी चालवताना काही चुका झाल्यास, अपघात झाल्यास जसे तुमचे नुकसान होणार आहे तसेच कंपनीचे देखील नुकसान होणार आहे. त्यामुळे कंपनी स्वतःचा फायदा बघतानाच चालकाचा ड्रायव्हिंग इतिहास (Driving History) तपासून घेत असते. यानुसार विमा कंपनी वाह्म विम्याचा हप्ता ठरवत असते. ही तुमची पहिली गाडी असल्यामुळे साहजिकच तुम्हाला वाहन विम्याचा हप्ता महाग पडेल.
वडिलांच्या नावे विमा काढल्यास काय होईल?
तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने जर कार विमा काढलात तर तुम्हांला विमा हप्त्यात थोडी सवलत मिळू शकते. खरे तर व्यक्तीपरत्वे हे प्रकरण वेगवेगळे असू शकते. वडिलांना ड्रायव्हिंग अनुभव जास्त असेल तर त्यांचे
वय, ड्रायव्हिंग रेकॉर्ड, आदी गोष्टींचा विचार करता गाडीचा विमा हप्ता कमी बसेल. तुमच्या वडिलांचे ड्रायव्हिंगचा रेकॉर्ड चांगले असेल आणि त्यांनी सतत विमा संरक्षण घेतले असेल, तर त्यांना विमा कंपन्यांद्वारे कमी जोखीम असलेला ड्रायव्हर म्हणून सवलत दिली जाऊ शकते. यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव नसलेल्या नवीन ड्रायव्हरच्या तुलनेत वडिलांच्या पॉलिसीसाठी विमा प्रीमियम कमी होऊ शकतो.
यातून तुम्हाला कसे विमा संरक्षण मिळेल?
विमा कंपनीला सांगून जर तुम्ही ‘Named’ किंवा ’Paid Driver’ या श्रेणीत तुमचे नाव टाकले तर तुमचा अपघात विमा देखील यात कवर केला जाऊ शकतो. म्हणजेच गाडीचा विमा, गाडी चालकाचा विमा आणि सोबत घरातील आणखी एका व्यक्तीचा विमा असे वेगवेगळे फायदे एकाच विम्यात तुम्ही मिळवू शकता. अशाप्रकारे कार विम्यावर तुम्ही संभाव्य बचत करू शकता. सगळ्याच विमा कंपन्या अशा प्रकारच्या सवलती देतात, परंतु त्यासाठी आपण तशी मागणी कारे गरजेचे आहे.
या व्यतिरिक्त आणखी एक मार्गाने तुम्ही विमा हप्ता कमी करू शकता. बर्याच विमा कंपन्या, एकाच पॉलिसी अंतर्गत एकापेक्षा अधिक कारचा विमा तसेच घर आणि कार या दोघांचा एकत्र विमा देखील कमीत कमी पैशात देऊ करतात. अशावेळी कमी पैशात जास्त फायद्याचा विमा तुम्ही घेऊ शकता.