घर सजवणे कुणाला आवडत नाही? आपलं घर देखण दिसावं, त्यात सगळ्या गोष्टी टापटीप असाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण हवे तितके प्रयत्न करत असतो. यात खर्चाचा भाग तर आलाच. कमी खर्चात, बचतीमध्ये आपण आपलं घर कसं सजवू शकतो याबद्दल या लेखात आपण चर्चा करणार आहोत. सोबतच घरासाठी फर्निचर घेताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दलच्या टिप्स देखील जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
बजेट सेट कराच!
घरासाठी फर्निचर घेताना तुम्ही फर्निचरवर किती खर्च करू इच्छिता हे ठरवा. बजेट लक्षात ठेवल्याने फर्निचर घेताना खरेदी करताना तुमचे लक्ष केंद्रित राहील आणि व्यर्थ खर्च टाळता येईल. सोबतच हवे तितकेच फर्निचर घेतलेले बरे. उगाच घरात फर्निचरची गर्दी नको.
चांगली डील मिळावी म्हणून तुम्ही जर प्रयत्नशील असाल तर फर्निचर स्टोअरच्या जाहिरातींवर लक्ष ठेवा. अनेक किरकोळ विक्रेते विकेंड ऑफर्स, क्लिअरन्स सेल आयोजित करत असतात आणि खरेदीवर ऑफर्स देतात. कमी खर्चात फर्निचर मिळवण्यासाठी या संधींचा फायदा घ्यायला विसरू नका.
सेकंड-हँड फर्निचरचा विचार करा
सेकंड-हँड फर्निचरसाठी थ्रिफ्ट स्टोअर्स (सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करण्याचे ठिकाण),OLX स्टोअर्स, परिसरातील काही दुकाने आणि ऑनलाइन मार्केटप्लेस एक्सप्लोर करा. उत्तम स्थितीतील टिकाऊ आणि पैसे वाचवणारी डील तुम्हांला इथे मिळू शकते.
मोठ्या शहरांमध्ये सेकंड-हँड फर्निचर विकणारी बरीचशी दुकाने असतात. कुणा कर्मचाऱ्यांची दुसऱ्या शहरांत बदली झाल्यास किंवा परदेशात नोकरीधंद्यासाठी स्थायिक झाल्यास ते अशा दुकानांमध्ये फर्निचर विकतात, जे वापरण्यायोग्य असतात.
ऑनलाइन स्टोअर्स बघा
स्पर्धात्मक किमती आणि विनामूल्य शिपिंग ऑफर करणारे ऑनलाइन फर्निचर किरकोळ विक्रेते शोधा. आजकाल असे अनेक स्टोअर्स उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला किमतींची तुलना करता येते आणि बचतीच्या डील्स शोधता येतात. मात्र ऑनलाइन शॉपिंग करताना स्टोअर्सबद्दल संपूर्ण माहिती घ्या. वस्तू कारेडी करण्यापूर्वी कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नका.
फ्लोअर मॉडेल्स, क्लीयरन्स आयटम्स खरेदी करा: फर्निचर स्टोअर्स अनेकदा फ्लोअर मॉडेल्स (Floor Models) आणि क्लिअरन्स आयटम्स (Clearance Items) सवलतीच्या दरात विकतात जेणेकरून नवीन इन्व्हेंटरीसाठी त्यांना जागा मिळेल. या प्रकारच्या विक्रीत फर्निचरमध्ये किरकोळ त्रुटी असतात, त्या एकदा तपासून घ्या. जर डील फायद्याची, बचतीची वाटत असेल तर खरेदी करायला काहीच हरकत नाही.
भाड्याने फर्निचर घ्या
भाडे तत्वावर फर्निचर घेणे ही काही नवी बाब राहिलेली नाही. मोठमोठ्या शहरांत नोकरी निमित्त आलेले कुटुंब भाड्याने फर्निचर घेताना दिसतात.तुम्हाला फर्निचरची तात्पुरती गरज असल्यास, महागडे फर्निचर खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेण्याचा जरूर विचार करा. ज्या परिस्थितीत तुम्हाला काही महिन्यांसाठी वास्तव्य करावे लागत असेल अशा प्रसंगी हा पर्याय फायद्याचा ठरू शकतो.
या सगळ्या टिप्स वापरून, तुम्ही तुमचे घर स्टायलिश आणि फंक्शनल फर्निचरने सुसज्ज करू शकता. त्यामुळे तुमचे घर देखणे दिसेलच, सोबतच तुमचे पैसे देखील वाचणार आहेत. फर्निचर खरेदी करताना या गोष्टींचा नक्की विचार करा.