Swaraj Tractors Launched New Model : महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या ट्रॅक्टर उत्पादक कंपनी स्वराज ट्रॅक्टर्सने आपल्या ट्रॅक्टरचे दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणले आहे. पहिल्या ट्रॅक्टरच्या मॉडेलचे नाव स्वराज टार्गेट 630 (Swaraj Target 630) आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मॉडेलचे नाव स्वराज टार्गेट 625 (Swaraj Target 625) आहे. कंपनीने काढलेल्या या दोन्ही ट्रॅक्टरचे मॉडेल कॉम्पॅक्ट लाइटवेट प्रकारातील आहेत.
Table of contents [Show]
शेतकऱ्यांचा नफा वाढेल
आधी शेतकरी बैलांना नागराला जोतून शेतीमध्ये वखारणी आणि पेरणी करीत असे. तसेच, बंडीवर माल वाहून नेत असे. मात्र, आता आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने शेती केली जाते, यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. शेतीतील माल वाहून नेण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा उपयोग होतो. याबाबी लक्षात घेता, स्वराज ट्रॅक्टर्सने आधुनिक आणि कॉम्पॅक्ट लाइटवेट प्रकारातील दोन ट्रॅक्टर्स लाँच केले आहे. या ट्रॅक्टर्सचा वापर करुन देशातील शेतकरी आपल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकतो, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात उपलब्ध होणार स्वराज
स्वराज टार्गेट 630 ट्रॅक्टर मॉडेलची सुरुवातीची किंमत कंपनीने 5.35 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत एक्स-शोरूम किंमत आहे. हा ट्रॅक्टर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या डीलर नेटवर्क अंतर्गत ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल. कंपनी आपले दुसरे मॉडेल टार्गेट 625 लवकरच बाजारात आणणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण ट्रॅक्टर्स
स्वराज ट्रॅक्टर्सने लाँच केलेल्या या दोन्ही नवीन टार्गेट रेंज मॉडेल्समध्ये कंपनीने अनेक सुविधा पुरविल्या आहेत. यात प्रामुख्याने कंबाईन पॉवर आणि प्रगत तंत्रज्ञान यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅक्टर चालक फवारणी व शेतीतील इतर कामे करू शकतो. हे दोन्ही ट्रॅक्टर 20 ते 30 हॉर्स पावर श्रेणीत येतात. स्वराज कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवरून अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरून ट्रॅक्टर तयार करते.
मे महिन्यातील विक्रीचा विक्रम
कृषी उपकरण क्षेत्रातील स्वराज ट्रॅक्टर्सची कामगिरी बघितल्यास असे लक्षात येते की, कंपनीने मे महिन्यात 34,126 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. या विक्रीत 4% घट नोंदवली गेली असली तरी, गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने एकूण 35,722 युनिट्सची विक्री केली होती. मे महिन्यात देशांतर्गत बाजारात एकूण 33,113 ट्रॅक्टरची विक्री झाली. तर मे महिन्यात कंपनीने एकूण 1013 युनिट ट्रॅक्टरची निर्यात केली.