Sundar Pichai Luxury House : Google व त्यांच्या पेरेंट कंपनी Alphabet चे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आहे 226 मिलीयन डॉलर. जगात सर्वाधिक पगार असलेला व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे सुंदर पिचाई यांची लाईफस्टाईल, कुटुंब, शिक्षण, करिअर आणि राहत्या घराबद्दल जाणून घ्यायची आपल्या सगळ्यांचीच इच्छा असेल. तर आज जाणून घेऊयात सुंदर पिचाई यांच्याबद्दल.
सुंदर पिचाई यांचा जन्म, शिक्षण
सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूतल्या मधुराई जिल्ह्यात झाला आहे. याच ठिकाणी त्यांचं प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूरमधून (IIT Kharagpur) मेटलर्जिकल विषयात इंजिनियरिंग पूर्ण केलं. आणि पुढच्या शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतल्या स्टँडफोर्ड विद्यापिठातून मटेरियल सायन्स विषयात मास्टर पदवी मिळवली. पुढे व्हारटोन स्कूल ऑफ यूनिव्हर्सिटी ऑफ पेनेनसेल्विया मधून एमबीएची पदवी घेतली.
सुंदर पिचाई यांचं करिअर
पिचाई यांनी मास्टर पदवी घेतल्यावर सिलिकॉन व्हॅलीतल्या सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपनीमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला सुरूवात केली. त्यानंतर 2002 त्यांनी अमेरिकेतल्या पेनेनसेल्वियामध्ये एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॅकिन्से कंपनीमध्ये सल्लागार म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली. तेथून दोन वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये त्यांनी गूगल कंपनी जॉइन केली.
सुरूवातीला गूगल ड्राईव्हचे प्रॉडक्ट मॅनेजर असलेल्या पिचाई यांनी नवनविन जबाबदाऱ्या स्विकारत वेळोवेळी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. पिचाई यांच्या प्रयत्नांमुळेच 2008 साली गूगल क्रॉम हे गूगलचे सर्वाधिक चालणारं प्रॉडक्ट उदयास आलं. या यशानंतर सुंदर पिचाई यांची ओळख संपूर्ण जगाला झाली. आणि त्यानंतर गूगलने 2015 साली कंपनीच्या सीईओ पदाची धुरा पिचाई यांच्या हाती दिली. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये अल्फाबेट या पेरेंट कंपनीचे सीईओपद सुद्धा पिचाई यांच्या हाती देण्यात आलं. नुकताच सुंदर पिचाई यांना 218 मिलीयन डॉलर स्टॉक अवॉर्डने गौरविण्यात आलं आहे.
सुंदर पिचाई यांचं आलिशान घर
सुंदर पिचाई यांच्या या खडतर प्रवासानंतर आपण पाहणार आहोत त्याचं आलिशान घर. पिचाई यांनी कॅलिफोर्नियामध्ये 40 मिलीयन डॉलरचं घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत 2022 मध्ये 10 कोटीने वाढली आहे. कॅलिफोर्नियातल्या सांता क्लारा कंट्री येथल्या लॉस अलटॉज या 31.17 एकरच्या परिसरामध्ये सुंदर पिचाई यांचं आलिशान घर आहे.
या घराच्या इंटिरियरसाठी पिचाई यांची पत्नी अंजली पिचाई यांनी 49 कोटी रूपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण घराचं आणि परिसराच्या सौदर्यिंकरणाचं काम हे अंजली पिचाई यांनी स्वत: लक्ष देऊन, कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी सांभाळून पूर्ण करुन घेतलं आहे. संपूर्ण घराचं इंटिरियर हे आधुनिकतेशी मिळतं-जुळतं आहे. या घरामध्ये स्विमिंग पूल, जिम, स्पा, मोठं गार्डेन, मोकळी जागा, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स अशा सगळ्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.