Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugar Price Hike: साखरेचे दर सहा वर्षांच्या उच्चांकावर; अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता

Sugar Price Hike

Image Source : www.medium.com

साखरेचे दर मागील पंधरा दिवसांत वाढले आहेत. तसेच अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या ऊस उत्पादन राज्यांना कमी पावसाचा जास्त फटका बसला आहे.

Sugar Price Hike: साखरेच्या दर मागील 6 वर्षांच्या उच्चांकावर पोहचले आहेत. तसेच अपुऱ्या मान्सूनमुळे पुढील हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकार निर्यातीवर बंधने घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक स्तरावरील साखरेच्या किंमतीपेक्षा भारतात साखरेचे दर तुलनेने कमी आहेत. मात्र, आता दरवाढ दिसून येत आहे. 

मागील पंधरा दिवसात किती दरवाढ?

किरकोळ आणि घाऊक बाजारात मागील पंधरा दिवसांत 3 टक्क्यांनी साखरेचे दर वाढले आहेत. हे दर मागील 6 वर्षातील सर्वाधिक आहेत. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी पुरेसा पाऊस देशातील अनेक भागात पडला नाही. 

एल-निनो या वातावरणीय घटकाचा परिणाम मान्सूनवर झाल्याचा दिसून येत आहे. खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. अल्प पावसामुळे साखरेचे उत्पादन कमी होऊ शकते. तसेच अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढू शकतात. 

2017 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक दरवाढ

एक टन साखरेचा दर 37,760 वर पोहचला आहे. म्हणजेच एक किलो साखरेचा दर 37 रुपयांच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2017  नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. जागतिक स्तरावर भारतापेक्षा 38 टक्क्यांनी सारखेचे दर जास्त आहेत. (sugar rate in India) म्हणजेच भारतीय रुपयांत जगभरातील साखरेचे दर पाहिले तर ते प्रति किलो सुमारे 51 रुपये आहेत. मात्र, आता भारतातील दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. 

निर्यात बंदीचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

सरकारने साखरेची निर्यात बंदी केली तर स्थानिक बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा होईल. त्यामुळे दर नियंत्रणात राहतील. मात्र, यामुळे ऊस शेतकऱ्यांना कमी भाव मिळू शकतो. पुढील काही महिन्यात देशात महत्त्वाचे सण आहेत. या काळात किंमती नियंत्रणात राहाव्यात हा सरकारचा प्रयत्न राहील. मात्र, निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव राहणार नाही. कांद्याच्या बाबतीतही तेच झाले. निर्यात बंदीमुळे स्थानिक बाजारातील कांद्याच्या किंमती खाली आल्या. 

अपुऱ्या पावसामुळे व्यापारी सावध झाले असून साखरेचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. (Low rain impact on sugar production) व्यापारी कमी किंमतीत साखर विकण्यास तयार नाहीत, असे बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे. 

साखरेचे उत्पादन किती टक्क्यांनी घटू शकते?

ऑक्टोबर महिन्यापासून गळीत हंगाम सुरू होईल. या हंगामात 3 कोटी 60 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षापेक्षा हे उत्पादन 3.3% टक्क्यांनी कमी होऊ शकते. कमी पावसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे.