टाटा उद्योगसमूह एक सामजिक जबाबदारीचे भान असलेला उद्योगसमूह आहे. ‘Payback to Society’ या तत्वानुसार हा उद्योगसमूह भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीपासून कार्यरत आहे. आर्थिक अडचणीमुळे आज देखील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटा ट्रस्ट दरवर्षी शिष्यवृत्ती देत असते. ट्रस्टतर्फे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत सहावी ते बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीबद्दल…
टाटा कॅपिटल लिमिटेड ही टाटा समूहाची एक प्रसिद्ध वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. आपल्या CSR (Corporate Social Responsibility) उपक्रमाचा एक भाग म्हणून एक शिष्यवृत्ती दिली जाते. टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप नावाने दिली जाणारी ही शिष्यवृत्ती महाविद्यालयीन (6 वी ते 10 वी) आणि ज्युनियर कॉलेजमध्ये (11 वी ते 12 वी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. म्हणजेच या शिष्यवृत्तीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्याने किमान 6 वी आणि कमाल 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता
ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागू शकते असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने/विद्यार्थिनीने 6 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये UG पदवी आणि PG पदवीसाठी प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा अधिक नसावे.
- कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येऊ शकतो.
- विद्यार्थ्यांनी फक्त चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील परीक्षेत किमान उत्तीर्ण होण्याची टक्केवारी निश्चित केली पाहिजे (ATKT विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत)
- एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुले अर्ज करू शकतात.
पात्र अभ्यासक्रम किंवा पदवी
- डिप्लोमा कोर्सेस
- पॉलिटेक्निक अभ्यासक्रम
- व्यावसायिक अभ्यासक्रम
- पदवीचे शिक्षण
- पदव्युत्तर शिक्षण
मिळणारे फायदे
वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 80% पर्यंत शैक्षणिक मदत दिली जाते. अभ्यासक्रमानुसार वेगवगेळ्या वर्गासाठी कमाल आर्थिक मदत ट्रस्टने ठरवलेली आहे.
- सहावी ते दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. 9,000/- शिष्यवृत्ती
- 11वी ते 12वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. 12,000/- शिष्यवृत्ती
- डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. 15,000/- शिष्यवृत्ती
- कुठल्याही पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. 20,000/- शिष्यवृत्ती
- व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. 50,000/- शिष्यवृत्ती
कधी करू शकाल अर्ज?
10 वी 12 वी चे निकाल लागल्यानंतर ही शिष्यवृत्ती टाटा ट्रस्टतर्फे जाहीर केली जाते, संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर याची घोषणा होत असते. तेव्हा शिष्यवृत्तीचे अपडेट मिळवण्यासाठी वेबसाईटवर लक्ष ठेवा. शक्यतो जून-जुलै महिन्यात शिष्यवृत्ती जाहीर केली जाते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना त्यासाठीची पात्रता आणि आवश्यक ती कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असतील याची खात्री करून घ्या.