Pandharpur Wari 2023: आषाढी वारी पुण्यातील मुक्काम झाल्यानंतर पुढे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या सहभागी झाल्या आहेत. ही पायी वारी पुढील 20 दिवसांनी पंढरपुरात पोहचले. लाखो वारकरी आणि भाविक यांची वारीमार्ग फुलून जातो. मुक्काम स्थळाला यात्रेचं स्वरूप येतं.
वारकऱ्यांसोबत फेरीवाले विक्रेत्यांचीही वारी घडते. पोटाची खळगी भरण्यासाठी सामानासह मग विक्रेतेही वारकरीच होतात. संपूर्ण वारी काळात लाखो रुपयांची उलाढाल होते.
पुण्यामध्ये वारी आली असता महामनीने फेरीवाले, विक्रेत्यांशी चर्चा केली. जवळजवळ सर्वच दुकानदार वारीसोबत आपलं सामान घेऊन पंढरपूरपर्यंत जातात. कपडे, लहान मुलांची खेळणी, शोभेच्या वस्तू, महिलांची आभूषणे, प्रसाद, कापडी पिशव्या, चपला-बूट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासह इतरही वस्तूंची दुकानं रस्त्याच्या दुतर्फा थाटलेली दिसतात.
राज्यभरातील विक्रेते, फेरीवाले वारीत दाखल
आळंदी, देहू येथून वारीचे प्रस्थान होते. त्यामुळे दुकानदार सर्वप्रथम आळंदी आणि देहूत दुकानं थाटतात. मुंबई, बीड, तुळजापूर, जेजुरी, नाशिक, जामखेड, सह इतरही शहरातील दुकानदार वारीमध्ये दुकान सुरू करतात. मुंबईतील काही मोठे व्यापारीही येतात. सायकल, ट्रॉली, मिनी ट्रक घेऊन सामानासह वारीसोबत येतात. या छोट्या मोठ्या व्यावसायिकांची संख्या दीड हजारांपेक्षा जास्त असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. काही दुकानदार मागील 15 ते 20 वर्षांपासून वारीसोबत दुकान घेऊन जात असल्याचं सांगतात.
वारीसोबत फिरती दुकानं
जर मोठे दुकान असेल तर दोन किंवा तीन छोट्या टेम्पोतून ते वारीसोबत सामान घेऊन येतात. जिथे वारीचा मुक्काम तिथे दुकान थाटतात. वाहन स्वत:चे असेल तर फक्त इंधनाचा खर्च करावा लागतो. मात्र, जर छोटा दुकानदार असेल तर त्याला एकट्याला टेम्पो परवडत नाही. मग चार-पाच छोटे दुकानदार मिळून टेम्पोतून सामान घेऊन जातात. सोबत काही सायकल किंवा हाताने ढकलायच्या ट्रॉलीतूनही सामान घेऊन वारीसोबत प्रवास करतात.
वारीसोबत जाण्यासाठी बोरिवलीहून पुण्यात आलेला विक्रेता
महामनीने मुंबईतील बोरिवली येथून आलेल्या एका पाणी बॉटल विक्रेत्याशी चर्चा केली. रऊफ शेख असं या व्यापाऱ्याचं नाव होतं. तो स्वत: आणि एक कामगार दोघे मिळून वारीसोबत दुकान घेऊन येतात. कुर्ला होलसेल मार्केटमधून वारीसाठी खरेदी केलेला माल पुण्यात आणण्यासाठी 6 हजार भाडे दिल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातून पुन्हा वारीसोबत पंढरपूरला जाण्यासाठी दुसरा टेम्पो भाड्याने घेतला आहे.
या टेम्पोत तीन चार इतर दुकानदारांचाही माल आहे. त्यामुळे भाडे वाटून येते. सोबतच चालकाचा भत्ता, इंधन, जेवण नाष्ट्यासाठी प्रतिदिन 1300 रुपये खर्च होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. तसेच दुकानातील कामगाराचा खर्चही करावा लागत असल्याचं ते रऊफ यांनी सांगितलं.
तुळजापूरहून सहकुटुंब वारीत येऊन दुकान थाटलं
अनिल विभूते हा तुळजापूरातील रहिवासी. आई-वडील भावासह संपूर्ण कुटुंब यात्रा, उत्सव, वारीमध्ये दुकान थाटतात. पंधरा वर्षांचा असल्यापासून वारीमध्ये वडीलांसोबत दुकानावर येत असल्याचे अनिल सांगतो. जेव्हा वारी असते तेव्हा 20 दिवस आम्हा विक्रेत्यांना झोप नसते. वारीबरोबर सामान नेताना दमछाक होते. अनिल विभूते याचे कुटुंब वारीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाच सहा दुकाने लावतात.
अनिल चष्मे आणि घड्याळे वारीत विकतो. वारीसाठी पाच सहा लाखांचा माल चेन्नई, हैदराबाद, शिवकाशी येथून खरेदी केला. आमचा स्वत:चा टेम्पो असून सामान खरेदीसाठी जातो. 20 दिवसांच्या वारीत पुरेल इतका माल भरतो. पुण्यात भवानी पेठेत वारी आली असता दिवसभरात सहा ते सात हजार रुपयांचा व्यवसाय झाल्याचं त्याने सांगितले. वस्तूंची खरेदी सोडून 30 ते 35% नफा मिळतो. एखाद्या दिवशी चांगला व्यवसाय होतो तर कधीकधी खूपच कमी विक्री झाल्याने दिवसाचा खर्चही निघत नाही, असेही तो म्हणाला.
ट्रॉली, सायकलवरही सामान मांडून प्रवास
नांदेड येथून आलेला सागर नामक विक्रेता लहानपणासून वडीलांसोबत वारीत दुकान लावत असल्याचे सांगतो. लहान मुलांची खेळणी विकण्याचा त्याचा छोटासा व्यवसाय आहे. आता वडील वारीसोबत येत नाहीत तर एकटाच वारीत येतो. एका ट्रॉलीत खेळणी, फुगे मांडून तो विक्री करतो. दिवसभर विक्री केल्यानंतर पहाटे वारी निघण्याआधीच दुसऱ्या थांब्याला दुकान लावून बसतो. हे सगळं सामान ट्रॉलीत भरून त्याचा पायीच प्रवास असतो. मुंबईतील व्यापाऱ्याकडून माल मागवतो. दिवसभरात दोन- अडीच हजार रुपयांचा व्यवसाय होतो. गर्दी जास्त असेल तर तीन हजारांपेक्षाही जास्त व्यवसाय होत असल्याचं तो म्हणाला.
छोट्या दुकानदारांच्या व्यथा
वारीसोबत फिरणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आळंदीमध्ये सुरक्षा आणि गर्दीचे कारण देत पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला दुकाने लावू दिली नाहीत. त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं दुकानदार सांगतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी घरासमोर किंवा एखाद्या दुकानासमोर नागरिक बसू देत नाहीत. दुकान मांडायचे पैसे मागतात नाहीतर दुकान हलवायला सांगतात. निवारा, जेवण आणि पाण्याची सोय नसेल तर जे भेटेल ते खावं लागतं. तसेच काही गावगुंड दुकानातील सामान पैसे न देताच घेऊन जातात, असं या दुकानदारांनी सांगितलं. वारीसोबत 20 दिवसांचा हा प्रवास छोट्या दुकानदारांसाठीही खडतर असतो.