Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर बाजार गुंतवणूक माहिती: कसे आणि कोणते विकत घ्यावे शेअर्स?

शेअर बाजार गुंतवणूक माहिती: कसे आणि कोणते विकत घ्यावे शेअर्स?

शेअर खरेदी करताना ह्या गोष्टींचा विचार जरूर करावा...

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे नक्की केल्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडतो की नेमके कोणते शेअर्स घ्यायचे ! आपण जर ब्रोकर्सकडून गुंतवणूक करणार असाल तर तेथे तुम्हाला यासंबंधीची माहिती दिली जातेच; पण तरीही काही प्राथमिक माहिती असणे गरजेचे ठरते. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सर्वप्रथम आपणास किती रक्कम गुंतवायची आहे याचा अंदाज घ्यावा आणि त्यानुसार कंपनीची निवड करावी.

शेअर बाजाराचे दोन एक्स्चेंज आहेत. एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE). NSE मध्ये 1641 नोंदणीकृत कंपन्या आहेत; तर BSE मध्ये 5248 नोंदणीकृत कंपन्या आहेत.

प्रत्येक कंपनीच्या समभागाचे मूल्य अर्थातच वेगवेगळे असते. कोणीही व्यक्ती शेअर्समध्ये नफा मिळवण्यासाठीच गुंतवणूक करत असतो. त्यामुळे अधिक नफा कशातून मिळेल याचा शोध प्रत्येक जण घेणे स्वाभाविक आहे. मुळात हा नफा ठरतो कसा हे आधी समजून घ्या. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये शेअर बाजाराचे कामकाज चालते आणि त्यामध्ये सर्वच कंपन्यांच्या समभागांत चढउतार होत असतात. ज्या समभागांची खरेदी जास्त होते त्यांचे मूल्य वधारते; तर ज्यांची विक्री अधिक होते त्यांचे मूल्य घटते. 

आपणही जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हाचे मूल्य आणि आपण विक्री करतो तेव्हाचे मूल्य यामध्ये जो फरक असेल त्यानुसार आपला नफा वा तोटा ठरतो. उदाहरणार्थ, आपण कोल इंडिया या सरकारी कंपनीचे 100 समभाग 154 रुपयांना एक याप्रमाणात जानेवारी 2022 मध्ये घेतले असतील आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ते विकण्याच्या वेळी त्यांची किंमत 170 रुपये झाली असेल तर तुम्हाला प्रति शेअर 16 रुपये याप्रमाणे सुमारे 1600 रुपये नफा मिळेल. परंतु जर फेब्रुवारीमध्ये तुम्ही विकताना त्याचे मूल्य 154 रुपयांपेक्षा खाली आले असेल तर तुम्हाला तोटा होईल.

यावरून दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे आपण शेअर्स विक्रीसाठी विशिष्ट तारीख किंवा मुदत असा निकष ठेवणे उचित ठरणारे नाही. त्याऐवजी ज्या दिवशी शेअर्सचे मूल्य वाढलेले असेल त्या दिवशी त्याची विक्री करणे हा निकष फायदेशीर ठरेल. याला जोडून दुसरी गोष्ट म्हणजे हा निकष पाळायचा झाल्यास या समभागांमध्ये गुंतवलेली रक्कम आपल्याला विशिष्ट तारखेला मिळेलच याची  हमी नसल्याने त्या रकमेवर आधारीत कसल्याही खर्चाचे नियोजन करु नका. त्याऐवजी सदर रक्कम ही आपल्याकडे नाहीये असे मानून चाला. किंबहुना, शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सर्वांत श्रेष्ठ किंवा फायदेशीर फॉर्म्युला दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे हाच आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरदार असाल किंवा छोटे व्यावसायिक असाल तर आपल्या कमाईतील काही रक्कम दरमहा बाजूला काढून ती शेअर्समध्ये गुंतवत चला.

यासाठी एकाच क्षेत्रातील कंपन्यांची निवड करण्याऐवजी बँकिंग, रिअल इस्टेट, धातू, औषधनिर्मिती, आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची निवड करा. यातूनच वर्षभरानंतर तुमचा पोर्टफोलियो तयार होईल. अर्थात यासाठी अन्यही अनेक नियम आणि निकष समजून घेणे आवश्यक आहे.