Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kishori Shakti Scheme: मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी 'किशोरी शक्ती' योजना

Kishori Shakti Scheme

Kishori Shakti Scheme: राज्य सरकारने 'किशोरी शक्ती' योजना (Kishori shakti scheme) सुरू केली आहे. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी ही योजना राबवली जाते. मुलींचा सर्वांगीण विकास हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

टीन एजर्स किंवा किशोरवयीन ही संज्ञा 10 ते 19 वर्षांपर्यंतच्या वयातील मुला-मुलींसाठी वापरली जाते. या वयात मुलामुलींच्या शरीराच्या आकारात, शरीर रचनेत तसेच मानसिक आणि सामाजिक क्रियांमध्ये वेगाने बदल होत असतात. या वयामध्ये मुलींना समजून घेण्याची तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. त्यासाठी राज्य सरकारने 'किशोरी शक्ती' योजना (Kishori shakti scheme)  सुरू केली आहे. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी ही योजना राबवली जाते.   

किशोरी शक्ती योजनेची उद्दिष्टे - (Objective of Kishori Shakti scheme) 

1) 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींचा आरोग्यविषयक व पोषणविषयक दर्जा सुधारणे.
2) किशोरवयीन मुलांनी घरगुती व व्यवसायभिमुख शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे व अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे. 
3) किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बालसंगोपन  व व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता या विषयांचे शिक्षण देऊन जागृत करणे.
4) बालविवाहास प्रतिबंध घालणे. 
5) किशोरवयीन मुलींमध्ये निर्णय क्षमता वाढविण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे.  

सहा महिन्यांसाठी निवड

या योजनेसाठी प्रत्येक परिक्षेत्रातून 11 ते 18 वयोगटातील 20 किशोरवयीन मुलींची 6 महिन्यांसाठी निवड करावी. त्यापैकी 15 ते 18 वयोगटातील मुलींना अंगणवाडीशी संल्गन करुन घ्यावे, व प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. दारिद्र्य रेषेखालील, शाळा सोडलेल्या अनुसूचित जाती जमातींमधील किशोरवयीन मुलींना निवड करताना प्राधान्य देण्यात यावे.

किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रमाचे आयोजन (Event for Young Girls)

किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे आणि वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इ बाबतचे आरोग्य आणि स्वच्छतेसंबंधीत शिक्षण तसेच प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेतंर्गत किशोरींकरिता ’किशोरी मेळावा’, ’किशोरी आरोग्य शिबीर’ असे विविध प्रकारचे कार्यक्रम अंगणवाडी केंद्र पातळीवर  आयोजित केले जातात. ज्या किशोरींना रक्तक्षय झाला असेल अशा मुलींची आर्यन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन विशेष काळजी घेतली जाते तसेच त्यांना स्वच्छतेविषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते. या योजनेस केंद्र शासनाकडूनही मदत केली जाते.

कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाते?

सद्यस्थितीत ही योजना  अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.