Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीची स्टार्टअपची संकल्पना भारतात व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतंय. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा त्यातही निधीचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्यानं स्टार्टअपची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय.

आपलाही एक व्यवसाय असावा, आपणही लहानापासून एक मोठा उद्योजक (Businessman) अशी भरारी घ्यावी, अशी देशातल्या तरुणांची इच्छा आहे. त्यामुळे नवं काहीतरी करण्याचा ट्रेंड भारतीय तरुणांमध्ये दिसून येतो. देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. या लोकसंख्येतून तरूण उद्योजक (Entrepreneurship) निर्माणही होत आहेत. म्हणूनच की काय भारत ही जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनलीय. मात्र यंदाचं वर्ष (2023) स्टार्टअप्ससाठी फारसं अनुकूल नसल्याचं दिसतंय.

गुंतवणूकदारांचा बदलतोय पसंतीक्रम

भारतीय स्टार्टअप्सना मिळणारा निधी वरचेवर कमी होतोय. एप्रिल 2023 या महिन्यात तर भारतीय स्टार्टअप्सना गेल्या 9 वर्षांतला सर्वात कमी निधी मिळाला आहे. जगातल्या आर्थिक घडामोडी झपाट्यानं बदलत आहेत. या बदलणाऱ्या घडामोडींचा भारतावरही परिणाम दिसून येतोय. अनेक मोठे उद्योग आर्थिक अडचणीत असल्याचं सांगतात. कर्मचारी कपात होतेय. निधीच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होतायत. या सर्व जागतिक घडामोडींचा फटका स्टार्टअप कंपन्यांना सहन करावा लागलाय. गुंतवणूकदार आपला पसंतीक्रम बदलत आहेत. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांना निधी मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. 

निधीचा निचांक

स्टार्टअप्सना मिळणारा निधी कमी होतोय, हे आकडेवारीवरून दिसतंय. एंजल इन्व्हेस्टमेंट आणि व्हेंचर कॅपिटलिस्टनं भारतीय स्टार्टअप्समध्ये 381 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केलीय. ही गुंतवणूक जवळपास 58 डील्ससाठी करण्यात आलीय. मात्र मागच्या काही काळातली ही सर्वात कमी गुंतवणूक म्हणता येईल. साधारणपणे एप्रिल 2014पासूनचा विचार केल्यास भारतीय स्टार्टअप विभागातला हा निधीचा निचांक आहे. त्यावेळी 50 स्टार्टअप डीलसाठी 108 दशलक्ष डॉलर निधी मिळाला होता. त्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी असल्याचं दिसतं.

काय आहेत जागतिक कारणं?

जागतिक दृष्टीनं विचार केल्यास भारत हे जगातलं तिसरं स्टार्टअप हब आहे. देशात सध्याच्या घडीला 90,000 आणि त्याहूनही अधिक स्टार्टअप सध्या कार्यरत आहेत. त्यातले सुमारे 107 स्टार्टअप युनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअप्सचं मूल्यांकन 100 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. मात्र भारतातल्या अनेक स्टार्टअप्सना आर्थिक बाबतीत सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय. निधी मिळण्यात अडचणी आहेत, त्याची कारणं जागतिक आहेत. व्याजदर वाढलेत. शेअर बाजारात अस्थिरता दिसून येतेय. त्याचबरोबर तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत सातत्यानं घसरण होतेय. त्यामुळे गुंतवणूकदारही स्टार्टअप फंडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास फारसे तयार नसतात. या सर्वांचा परिणाम स्टार्टअपच्या निधीवर झालाय. 

कर्मचारी कपात करण्याची वेळ

रशिया-युक्रेन युद्ध ही एक महत्त्वाची घडामोड मागच्या वर्षी झाली. त्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात वाढ केली. त्यानंतर अमेरिकेत बँकिंग संकट निर्माण झालं. यामुळे स्टार्टअप फंडिंगवर परिणाम झाला. भारतातल्या अनेक स्टार्टअप्सना परदेशातून फंडिंग होतं. निधीअभावी स्टार्टअप्सची अवस्था अशी झाल्यानं या स्टार्टअप्समधून नोकरकपात करण्याची वेळही निर्माण झालीय. होणारं आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी देशातल्या अनेक स्टार्टअप्सनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2023पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातल्या विविध स्टार्टअप्सनी जवळपास 9400 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यानंतरही छोट्या-मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरूच आहे.