Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Start-Up Governance: लक्झरी वाहनं अन् कोट्यवधींच्या पगारावर लगाम, स्टार्टअप मालकांना आधी स्वत:ला सिद्ध करावं लागणार

Start-Up Governance: लक्झरी वाहनं अन् कोट्यवधींच्या पगारावर लगाम, स्टार्टअप मालकांना आधी स्वत:ला सिद्ध करावं लागणार

Start-Up Governance: स्टार्टअप फाउंडर्सच्या लक्झरी वाहन आणि कोट्यवधीच्या पगारावर आता लगाम बसणार आहे. कारण व्हेंचर कॅपिटलिस्टच्या पैशांवर मौज करणाऱ्या स्टार्टअप फाउंडर्सचे दिवस आता गेले आहेत. स्टार्टअप मालकांना आता आधी स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.

भारतात अनेक स्टार्टअप मागच्या काही काळात सुरू झाली. मात्र अलीकडे स्टॉक मार्केटमध्ये (Stock market) अनेक स्टार्टअप फ्लॉप झाल्याचं दिसून आलं आहे. मोठं नुकसान होऊनदेखील उच्च मूल्यांकन ठेवणं, संस्थापक कंपन्यांमध्ये आर्थिक हेराफेरी करणं अशी विविध प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळेच आता स्टार्टअप कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सप्रमाणे काटेकोरपणा पाळण्याची योजना आहे. स्टार्टअप्सच्या या जगात नेमकं काय बदलणार आहे, जाणून घेऊ...

कन्सल्टिंग फर्म्सचा सल्ला

स्टार्टअप्सना फंडिंग करणाऱ्या अनेक व्हेंचर कॅपिटलिस्टना कन्सल्टिंग फर्म्सनी सल्ला दिला आहे, की एकदा त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये सहभागी कंपन्यांचं ऑडिटिंग करावं. या मुद्द्यावरून व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजेच उद्यम भांडवलदारांमध्ये एकमत असल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच अनेक ऑडिट कंपन्यांनीदेखील यासंबंधीचं प्रेझेंटेशन व्हेंचर कॅपिटलिस्टना दिलं आहे.

ऑडिटमध्ये आढळत आहेत चुका

भारतीय स्टार्टअप्समध्ये आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी आता सामान्य झाल्या आहेत. सगळ्यात आधी भारत पेमध्ये अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर मामाअर्थनं आयपीओमधून माघार घेतल्यानंतरदेखील आर्थिक अनियमितता आणि जादा मूल्यांकनाच्या (Over evaluation) बातम्या समोर आल्या. मिंटच्या एका बातमीनुसार, देशात सध्या 100 युनिकॉर्नपैकी फक्त 25 नफा कमावण्याच्या स्थितीत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या पेटीएम, झोमॅटो आणि नायका यासारख्या यापूर्वीच्या स्टार्टअप कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांचे मूळ पैसेदेखील परत करण्यात अपयशी ठरल्या आहेत.

...तर संभाव्य समस्या टाळता येवू शकेल

कंपन्यांच्या जुन्या ऑडिटमध्ये आर्थिक अनियमितता समोर आल्याचं इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालात म्हटलं आहे. एका व्हेंचर फंडाचा हवाला देत हा अहवाल देण्यात आला आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये वाढत्या गैरव्यवस्थापनाच्या अलीकडच्या काही घटनांनंतर, स्टार्टअप फाउंडर्स आणि इन्व्हेस्टर्समध्ये या विषयावरची चर्चा सर्वात महत्त्वाची झाली आहे. आता गुंतवणूकदार कोणत्याही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. यामुळे जर काही अनियमितता, गैरकारभार होत असेल तर तो वेळीच लक्षात यावा आणि संभाव्य समस्या टाळता येवू शकेल.

कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत विचार

स्टार्टअप जगतात कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणण्याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आता नुकतंच 'मोजोकेअर'च्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे. मोजोकेअरच्या संस्थापकांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना कबूल केलं, की त्यांनी कंपनीचा महसूल वाढवून सांगितला. त्यामुळेच आता गुंतवणूकदारांकडून स्टार्टअपच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलं जात आहे.

अनेक समस्या समोर

भारतपे (BharatPe) व्यतिरिक्त मागच्या एका वर्षात बायजू (Byju's), जिलिंगो (Jilingo), राहुल यादव्स फोरबी नेटवर्क (Rahul Yadav's 4B Network) आणि ट्रेल (Trell) यांसारख्या उद्यम निधी असलेल्या स्टार्टअप्समध्ये कंपनी ऑपरेशन्स आणि गव्हर्नन्सशी संबंधित अनेक समस्या समोर आल्या आहेत.

स्टार्टअप फाउंडर्सच्या लाइफस्टाइलवर होणरा परिणाम

मागच्या कालावधीतल्या या सर्व घटना पाहता आता उद्यम भांडवलदार भारतीय स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्याआधी अत्यंत सावधानता बाळगत आहेत. येत्या काही दिवसांत त्याचा परिणाम स्टार्टअप्सच्या निधीवर तसंच अनेकदा कोट्यवधी रुपयांचा पगार घेणाऱ्या स्टार्टअप फाउंडर्सच्या जीवनशैलीवर दिसून येईल. ते आलिशान वाहनांमध्ये फिरतात आणि आलिशान घरंही खरेदी करतात. त्याला अटकाव बसणार आहे.