Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup India Seed Fund Scheme: स्वत:चं स्टार्टअप सुरू करायचंय, पण फंडची अडचण; मग ही योजना खास तुमच्यासाठी

Startup India Seed Fund Scheme

Image Source : www.twitter.com

Startup India Seed Fund Scheme: एका सर्व्हेक्षणानुसार, 90 टक्के स्टार्टअप हे फक्त निधीअभावी बंद पडतात. निधीचा अभाव हे स्टार्टअपच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. हा अडथळा सरकारने Startup India Seed Fund योजनेद्वारे कसा दूर केला आहे, ते आपण पाहणार आहोत.

Startup India Seed Fund Scheme: स्टार्टअपसाठी फंड उभा करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. कोणतंही स्टार्टअप फंडिंगशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. निधी हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. चांगल्या संकल्पनेला योग्यवेळी निधी मिळाला नाही तर ती संकल्पना बारगळू शकते. ही सत्य परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकार अव्वल दर्जाच्या आणि सर्व अटी पूर्ण करणाऱ्या स्टार्टअपना अर्थसहाय्य करणार आहे.

स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेचा मुख्य उद्देश नाविन्यपूर्ण संकल्पनेचा पाठपुरावा करणे , त्याचे प्रारूप विकसित करणे, उत्पादनाच्या चाचण्या, मार्केटमधील प्रवेश आणि एकूणच प्रकल्पाच्या व्यावसायीकीकरणासाठी अर्थसहाय्य करणे हा आहे. 5 फेब्रुवारी 2021 मध्ये, सरकारने SISFS (Startup India Seed Fund Scheme) अधिकृत घोषणा केली होती. ही योजना चार वर्षांसाठी मंजूर करण्यात आली. 1 एप्रिल 2021 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेची वैशिष्ट्ये

स्टार्टअपना त्यांच्या प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर अर्थसहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

  1. 2021-22 पासून सुरू झालेल्या या योजनेसाठी 4 वर्षांचा कालावधी मंजूर करण्यात आला आहे.
  2. संपूर्ण भारतातील सर्वाधिक चांगले आणि पात्र स्टार्टअप प्रकल्पांसाठी 945 कोटी रूपयांचा निधी 4 वर्षांमध्ये विभागून देण्यात आला आहे.
  3. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेतून देशातील 3600 हून अधिक स्टार्टअपना मदत केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
  4. मे 2020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेशी स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना जोडण्यात आली आहे.
  5. पात्र स्टार्टअप प्रकल्पांना, संकल्पनांचा पाठपुरावा, प्रारूप विकसित करणे आणि उत्पादनांच्या चाचण्यांसाठी 20 लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तर व्यावसायिकीकरणासाठी, मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी, तसेच साधन-सामुग्री घेण्यासाठी 50 लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

सीड फंडिंग म्हणजे काय?

सीड फंडिंग म्हणजे कोणतंही स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधी उभारायचा. जर तुमच्याकडे एखादी चांगली स्टार्टअपची संकल्पना असेल, तर त्या संकल्पनेचं व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या खरेदीसाठी लागणारा निधी म्हणजे सीड फंडिंग. जेव्हा काही स्टार्टअप्स स्वत:चे पैसे लावून व्यवसाय उभा करतात तेव्हा त्याला, बूटस्ट्रॅपिंग म्हणतात.

स्टार्टअप इंडिया सीड फंड (SISFS) साठी कोण पात्र आहेत?

  • सर्वप्रथम डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT)ची स्टार्टअपला मान्यता मिळणे आवश्यक आहे.
  • सीड फंड योजनेसाठी अर्ज करताना स्टार्टअपची संकल्पना 2 वर्षापूर्वीची नसावी.
  • कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, शिक्षण, कृषी, अन्न प्रक्रिया, जैवतंत्रज्ञान, आरोग्यसेवा, ऊर्जा, गतिशीलता, संरक्षण, अंतराळ, रेल्वे, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • स्टार्टअपला इतर कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य मिळालेले नसावे.
  • स्टार्टअपमधील शेअरहोल्डिंग प्रकारात अर्ज करताना भारतीय गुंतवणूकदाराचा हिस्सा किमान 51 टक्के असणे आवश्यक आहे.

सीड फंडिंगसाठी असा अर्ज करा

  • सीड फंडिंग स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर Apply Now वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर आलेल्या मॅसेजमधून For Startups यावर क्लिक करा.
  • तुमच्याकडे लॉगिन आणि पासवर्ड असेल तर लॉगिन करून संपूर्ण माहिती भरा.
  • जर तुम्ही प्रथमच लॉगिन करत असाल तर स्वत:चे नवीन खाते सुरू करा आणि त्यानंतर लॉगिन करून सर्व माहिती भरा.