भारतीय स्टार्टअपसाठी (Startup) आताचा काळ फंडिंग विंटर (Funding Winter) (मंदीसदृश) आहे. म्हणजे स्टार्टअप उद्योगांना बाजारातल्या मंदीमुळे पुरेसा निधी मिळत नाहीए. स्विगी (Swiggy), ओला (Ola) यासारख्या कंपन्यांना नोकर कपातही करावी लागली. पण, BIS सारख्या काही कंपन्या युनिकॉर्न होण्यापर्यंतही पोहोचल्या. आणि अशा यशस्वी स्टार्टअप उदयोजकांनी 2022 मध्ये मुंबई, दिल्ली, पुणे आणि बेंगळुरू अशा महानगरांमध्ये कोट्यवधींची घरंही घेतली.
रिअल इस्टेटमधली कंपनी झॅपकीने (ZapKey) याविषयीचा अहवाल तयार केला आहे. आणि या अहवालानुसार, स्टार्टअप उद्योजकांपैकी आकाश चौधरी यांनी घरामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे 137 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आकाश यांनी काही वर्षांपूर्वी आकाश ट्युटोरिअल नावाने कोचिंग संस्था सुरू केली होती. गेल्यावर्षी बायजूने ती अब्जावधीची किंमत मोजून खरेदी केली. या करारातून मिळालेल्या रकमेतून आकाश यांनी दिल्लीतल्या चाणक्यपुरी इथं बंगला खरेदी केलाय.
आकाश चौधरी यांचे आणखी एक साथीदार जेसी चौधरी यांनीही ग्रेटर कैलाश भागात 51 कोटी रुपयांचं घर खरेदी केलं. झॅपकी संस्थेनं यावर्षी महागड्या घरांचा तयार केलेला अहवाल स्टार्टअपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण, एकूण 141 मोठ्या गृह मालमत्तांपैकी 12 मालमत्ता स्टार्टअप उद्योजकांनी खरेदी केलेल्या होत्या. आणि या 12 घरांची एकूण किंमत 507 कोटी रुपये इतकी होती.
स्टार्टअपच्या फक्त संस्थापकांनीच घरं खरेदी केली असं नव्हे तर फ्लिपकार्ट या स्टार्टअप कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी आदर्श पाम रिट्रिटमध्ये 8 कोटी रुपयांचं घर घेतलं. स्पॉटिफायचे भारतातले प्रमुख अमरजीत सिंग बात्रा यांनी दिल्लीच्या वसंतविहार भागात 13 कोटींचं घर खरेदी केलं.
स्टार्टअप व्यावसायिकांनी खरेदी केलेल्या घरांची यादी अशी आहे,
खरंतर यावर्षी स्टार्टअप कंपन्यांमधली गुंतवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत 52% नी कमी झाली आहे. आतापर्यंत 2022 वर्षात स्टार्टअप कंपन्यांना 5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकाच निधी मिळाला आहे. बंगळुरू हे देशातलं स्टार्टअप केंद्र मानलं जातं. तिथेही स्टार्टअपमधली गुंतवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत 46% कमी झाली आहे. मुंबईतल्या स्टार्टअप कंपन्यांना यावर्षी 4 अब्ज अमेरिकन डॉलर इतका निधी मिळाला.