Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Startup : भारतीय स्टार्टनी 20,000 लोकांना कामावरून काढलं 

Startup Lay off

India Startup : भारतीय स्टार्ट अप कंपन्यांनी 2022 मध्ये तब्बल 20,000 नोकर कपात केली आहे. आर्थिक मंदीच्या काळात स्टार्ट अपमधली गुंतवणूक कमी झाल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचं बोललं जातंय. कुठल्या स्टार्टअपने केली सगळ्यात मोठी नोकर कपात जाणून घेऊया

सध्याचा जमाना स्टार्टअपचा (India Startup) असल्याचं बोललं जातं. आणि भारतात यावर्षी किमान 15 कंपन्यांना युनिकॉर्नचा (Unicorn) दर्जाही मिळाला. पण, म्हणून सगळ्याच स्टार्टअपसाठी (Startup) हे वर्षं चांगलं होतंच असं नाही. कारण, 2022 सालात स्टार्टअपनी तब्बल 20,000 लोकांना कामावरून काढल्याचंही स्पष्ट झालं आहे. मनीकंट्रोल (moneycontrol.com) या वित्तविषयक वेबसाईटने हा डेटा संकलित केला आहे.    

2021 मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या मोठ्या नोकर भरती आणि गलेलठ्ठ पगारांनंतर 2022 मध्ये स्टार्टअपवर नोकर कपातीची वेळ आल्याचं दिसतंय. आणि याला कारण ठरलीय ती कोव्हिड नंतर जगभरात पसरलेली मंदी. आणि मंदीसदृश वातावरणामुळे स्टार्टअप कंपन्यांमध्ये कमी झालेली गुंतवणूक. स्टार्ट अप कंपन्यांना पहिली 4-5 वर्षं बाहेरून आर्थिक आधार लागतो. पण, यंदा गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याचं चित्र होतं.    

अगदी स्विगी (Swiggy) आणि ओला (Ola) सारख्या स्टार्टअप कंपन्यांनीही यंदा नोकर कपातीचा निर्णय घेतलाय. अगदी अलीकडचं उदाहरण आहे ते पेयु (PayU) कंपनीचं. त्यांनी एकाच वेळी 150 जणांना कामावरून काढलं. तर नोकर कपातीचं या वर्षातलं सगळ्यात मोठं स्टार्ट अप उदाहरण ठरलं ते बायजू (ByJu). या देशातल्या एका मोठ्या एड्युटेक कंपनीने वर्षभरात 4000 कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढलं.    

त्यानंतर अनअकॅडमीने (Unacademy) 1,150 तर वेदांतयु (Vedantu) या कंपनीने हजारच्या वर कर्मचारी कपात केली. ओला कंपनीने 2,000 तर ब्लिंकइट (BlinkIt) कंपनीने हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. या कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळात मोठी गुंतवणूक बाहेरून झालेली होती. आणि त्यांचं बिझिनेस मॉडेलही यशस्वी होतं. पण, नंतरच्या काळात विस्तारासाठी केलेली नोकर भरती कंपन्यांना नडली. आणि कर्मचारी वर्गाचं वेतन आणि इतर भत्त्यांची जुळवा जुळव न झाल्यामुळे या कंपन्यांवर कपातीची वेळ आली.