Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Financial Year: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बचतीचा श्रीगणेशा करा; ‘या’ 5 टिप्स येतील कामी

New Financial Year Saving Tips

New Financial Year: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात तुम्हीही बचतीचा (Saving) आणि योग्य गुंतवणुकीचा (Investment) श्रीगणेशा करू शकता. आर्थिक बचत करण्यासाठी काही नियमांचे पालन केल्यास आणि काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो.

जुनं आर्थिक वर्ष संपायला अगदी काही दिवसच बाकी राहिले आहेत. या उर्वरित दिवसात आपण कर सवलतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक (Investment) केली असेल किंवा नक्कीच करणार असाल. या संपूर्ण वर्षात आपण एक गोष्ट नक्कीच शिकलो आहोत, ती म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणुकीला सुरुवात करावी. ऐनवेळी आपल्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आणि वेळ दोन्हीही नसतो. त्यामुळेच आपली पुरती तारांबळ उडते आणि घाईगडबडीत केलेली गुंतवणूक बऱ्याच वेळा चुकीची ठरू शकते.

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 पासून सुरु होतंय. याच अनुषंगाने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बचत आणि गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणं गरजेचं आहे. बचत करण्यासाठीच्या 5 टिप्स आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

बजेट तयार करा

तुम्हालाही बचत करायची असेल, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट (Budget) तयार करायला शिका. खर्च करून उर्वरित रकमेची बचत करण्यापेक्षा, सुरुवातीला बचत करा आणि मग खर्च करायला शिका. आर्थिक नियोजन (Financial Planning) करताना आधी बचत मग खर्च हा कानमंत्र स्वीकारा. कोणत्याही गोष्टीसाठी खर्च करण्यापूर्वी त्याचे बजेट निश्चित करा. बजेटमुळे खर्चाचा अंदाज येतो आणि अतिरिक्त खर्च टाळला जातो. शिवाय पैशांची बचतही होते.

आर्थिक नियोजनाचे ध्येय ठरावा

आर्थिक नियोजन करताना ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पैशांची बचत करताना ती साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक स्वरुपात केली जाऊ शकते. तुम्ही ठराविक कालावधी निश्चित करून त्या कालावधीनुसार बचत स्वरुपात पैसे साठवू शकता. बँकेत सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) सुरु करून तुम्हीही गुंतवणूक करू शकता. मासिक स्वरुपात ठराविक रक्कम या खात्यात साठवल्याने वर्षाच्या शेवटी तुम्हाला मोठी रक्कम परत मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे या रकमेवर तुम्हाला बँकेकडून चांगला व्याजदरही मिळतो.

आवर्ती ठेव 

हल्ली महागाईमुळे सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणावर बचत करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत आवर्ती ठेव (Recurring Deposit) हा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आपल्यासमोर आहे. तुम्हाला जर कमी प्रमाणात बचत करायची असेल, तर तुम्ही आवर्ती ठेव (Recurring Deposit) हा पर्याय निवडू शकता. नोकरदार वर्गासाठी हा पर्याय सर्वोत्तम मानला जातो. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते किंवा तुम्ही तुमच्या बँकेतील बचत खात्यातून त्यासाठीचे पैसे ऑटो डेबिट (Auto Debit) करू शकता. मात्र यासंदर्भात बँकेला तशी कल्पना द्यावी लागेल. आवर्ती ठेवीमध्ये दर महिन्याला पैसे जमा केल्यावर, त्यावर व्याजही मिळते. या रकमेची मॅच्युरिटी झाल्यावर, आपल्याला एकरकमी मोठी रक्कम मिळते.

मुदत ठेव 

तुमच्याकडे एकरकमी मोठी रक्कम पडून असेल, तर तुम्ही ही रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेतील मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) गुंतवू शकता. यामध्ये बचत खात्यातील व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर (Interest Rate) मिळतो. किमान 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या सोयीच्या कालावधीनुसार गुंतवणूक करू शकता. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेवीचे व्याजदर हे वेगवेगळे असते. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर बँकांनी त्यांचे मुदत ठेवीवरील (FD) व्याजदर देखील वाढवले आहेत. त्यामुळे मुदत ठेव हा देखील बचतीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे.

कर्जाची रक्कम लवकरात लवकर फेडा

बचत करण्याअगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज (Loan) घेतले असेल, तर ते लवकरात लवकर फेडा. कर्ज देणारी व्यक्ती किंवा बँक दिलेल्या कर्जावर व्याजदर आकारते, त्यामुळे मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाला परत करावी लागते. बँकेतील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कर्जावरील व्याजदर जास्त आहे. त्यामुळे लवकर कर्ज फेडून बचतीकडे वळा. कर्जाच्या रकमेची परतफेड करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, तुमचा आपत्कालीन निधी (Emergency Fund) देखील तुम्हाला तयार करावा लागणार आहे.