अदानी समूहाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कंपन्यांमधील कथित गैरव्यवहारांबाबत हिंडेनबर्ग या गुंतवणूक संस्थेने रिपोर्ट जाहीर केल्यानंतर अदानी ग्रूप कंपन्यांचे शेअर्स ढासळले आहेत. तसेच श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून गौतम अदानी खाली फेकले गेले आहेत. आता जागतिक स्तरावरील बँकांनी अदानी यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. सिटी आणि क्रेडिट स्युसी (Credit Suisse) या बँकांनी अदानी समूहाला कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर आता स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेनेदेखील कर्ज देण्यास नकार दिला आहे.
कर्जरोखे तारण ठेवण्यास नकार (Standard chartered bank stops lending to Adani)
अदानी समूह डॉलरमधील कर्जरोखे (Doller bonds) तारण ठेवून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घेत होता. मात्र, आता हे कर्जरोखे तारण ठेवून कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. अदानी कर्जरोख्यांच्या अस्थिर किंमतीमुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. आशियाई देशांमध्ये स्टँडर्ड चार्टर बँकेच्या अनेक शाखा आणि सहयोगी संस्था आहेत. त्यांना कर्जरोखे तारण ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकेच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
स्टँडर्ड चार्टर बँकेने अदानी समूहाला (Adani Group) अत्यल्प कर्ज दिले आहे. त्याचा बँकेवर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र, गुंतवणूकदार आणि बँकेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कर्ज न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विदेशातून कर्ज मिळण्यास अदानी समूहाला अडचण (Adani not able to get loan from foreign country)
अदानी समूहाला स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक म्हणजे अडीच बिलियन डॉलरपेक्षाही जास्त कर्ज दिले आहे. जर हे कर्ज बुडीत निघाले तर स्टेट बँक इंडिया दिवाळखोरही होऊ शकते. सोबतच एलआयसी आणि इतरही भारतीय बँकांनी अदानी समूहातील कंपन्यांना कर्ज दिले आहे. अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना परदेशातून कर्ज मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. याआधी अदानी समूह कर्जरोखे तारण ठेवून परदेशी वित्त संस्थांकडून कर्ज घेत होता. मात्र, आता परदेशी वित्त संस्थांनी कर्ज देण्यात मनाई केली आहे. अशा परिस्थितीत अदानी समूहाला देशी गुंतवणूकदारांची गरज भासणार आहे. त्यामुळे पुढील एक वर्षात अदानी समूहाला कर्ज देणार का? असा सवाल पत मानांकन संस्थांनी बँकांना विचारला आहे.
कर्जाची चौकशी करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश (RBI directs to inquiry Adani debt)
अदानी समूहाला दिलेल्या कर्जाचा तपशील सादर करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. यामध्ये काही अनियमितता आहे का? याचा तपास आरबीआयकडून करण्यात येणार आहे. अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णयही नुकताच घेतला आहे. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार बुचकळ्यात पडले आहेत.