सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तरीही बँकेतील मुदत ठेव (Fixed Deposit Scheme) हा पारंपरिक आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ओळखला जात आहे. ग्राहकांनी बँकेच्या मुदत ठेवीत जास्तीत जास्त पैसे गुंतवावे, या हेतूने बँका विशेष मुदत ठेव योजना राबवितात. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदर दिला जातो. देशातील नामांकित एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव (Special FD Scheme) योजना राबवली होती. या योजनेचे नाव 'सिनियर सिटीझन केअर फिक्स्ड डिपॉझिट प्लॅन' (HDFC Senior Citizen Care Fixed Deposit Plan) असे आहे.
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2023 निश्चित करण्यात आली होती. मात्र आता बँकेने या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवला आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेत 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के जास्त व्याजदर देण्यात येत आहे. या निमित्ताने या विशेष मुदत ठेव योजनेबद्दल जाणून घेऊयात.
0.25 टक्के वाढीव व्याजदराचा मिळेल लाभ
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सिनियर सिटीझन केअर फिक्स्ड डिपॉझिट प्लॅन' (HDFC Senior Citizen Care Fixed Deposit Plan) पुन्हा एकदा नव्या गुंतवणूक मर्यादेसह सुरू केला आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर 0.25 टक्के जास्त व्याजदर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर मिळणारा 0.50 टक्के वाढीव व्याजदर देखील यामध्ये मिळणार आहे. एकूण 0.75 टक्के जास्तीच्या व्याजदराचा लाभ या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.
कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर मिळेल?
एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार 5 कोटीहून कमी रकमेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांना या विशेष मुदत ठेव योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी मुदत ठेव कालावधी 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 5 ते 10 वर्षाच्या दरम्यान करण्यात आलेल्या मुदत ठेवीसाठी 7.75 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. तसेच 7 दिवस ते 10 वर्षाच्या दरम्यान 3.35 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर मिळणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com