Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Score Tips: क्रेडिट कार्ड न वापरता 'सिबिल स्कोअर' वाढवायचाय? फॉलो करा 'या' 5 सोप्या आणि भन्नाट ट्रिक्स

Credit Score Tips

Credit Score Tips: कर्ज किंवा लोन मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर चांगला असणे खूप गरजेचे आहे. क्रेडिट कार्ड न वापरताही तुम्ही तुमचा स्कोअर कसा वाढवू शकता, याच्या सोप्या टिप्स.

आजच्या काळात चांगला सिबिल स्कोअर असणे म्हणजे केवळ एक आकडा नाही, तर ती भविष्यात कर्ज मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. पण अनेकांकडे क्रेडिट कार्ड नसते, किंवा त्यांना ते वापरायचे नसते. अशा वेळी क्रेडिट कार्डशिवाय चांगला क्रेडिट प्रोफाईल बनवता येतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

याचे उत्तर 'हो' असे आहे. क्रेडिट कार्डला हात न लावताही तुम्ही तुमचा स्कोअर अगदी सहज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या आर्थिक सवयी बदलाव्या लागतील आणि काही गोष्टींचे भान ठेवावे लागेल.

बँका कोणत्या ५ गोष्टी तपासून कर्ज देतात?

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला पैसे देण्यापूर्वी खालील ५ महत्त्वाच्या गोष्टी (5 C's) तपासते:

स्वभाव आणि पूर्वइतिहास (Character): तुम्ही भूतकाळात घेतलेली कर्जे वेळेवर फेडली आहेत का, तुमचा बँक रेकॉर्ड कसा आहे, यावरून तुमची विश्वासार्हता ठरते.

क्षमता (Capacity): तुमचे उत्पन्न, महिन्याचा खर्च आणि सध्या सुरू असलेली कर्जे पाहून तुम्ही नवीन लोन फेडू शकाल की नाही, हे बँक तपासते.

भांडवल (Capital): तुमच्या नावावर असलेली बचत, इतर गुंतवणूक किंवा मालमत्ता पाहून बँक तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावते.

तारण (Collateral): सुरक्षित कर्जासाठी तुम्ही बँकेकडे काय तारण ठेवू शकता (जसे की फिक्स डिपॉझिट किंवा जागा), यावरून मंजुरीचे नियम ठरतात.

परिस्थिती (Conditions): सध्या बाजारातील व्याजदर काय आहेत आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी कर्ज घेत आहात, या बाह्य गोष्टींचाही तुमच्या प्रोफाईलवर परिणाम होतो.

तुमचा स्कोअर कशामुळे ठरतो?

कोणतीही पावले उचलण्यापूर्वी, तुमचा स्कोअर नक्की कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे माहीत असणे गरजेचे आहे. यामध्ये वेळेवर केलेली पैशांची परतफेड सर्वात महत्त्वाची असते. यासोबतच तुम्ही उपलब्ध मर्यादेपैकी किती कर्ज वापरता, तुमचे कर्ज खाते किती जुने आहे आणि तुमच्या नावावर सुरक्षित (होम लोन) व असुरक्षित (पर्सनल लोन) अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांचा समतोल आहे का, यावरून तुमचा स्कोअर ठरतो. कमी काळात खूप जास्त वेळा कर्जासाठी चौकशी किंवा अर्ज केल्यास स्कोअर कमी होतो.

क्रेडिट कार्डशिवाय स्कोअर वाढवण्याचे 5 सोपे मार्ग

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल, तर तुम्ही खालील पद्धतींचा वापर करून स्वतःचा स्कोअर कडक करू शकता:

सध्याची कर्जे वेळेवर फेडा: जर तुमचे आधीच एखादे लोन सुरू असेल, तर त्याचे हप्ते (EMI) अगदी वेळेवर भरा. वेळेवर पैसे भरणे हा स्कोअर वाढवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे.

कंझ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय: फ्रिज, टीव्ही किंवा मोबाईल खरेदी करताना दुकानातून मिळणारे लहान कर्ज सहज मंजूर होते. याचे हप्ते वेळेवर भरल्यास तुमची क्रेडिट हिस्ट्री वेगाने तयार होते.

सुरक्षित कर्ज (Secured Loan) घ्या: बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवून त्यावर लहान कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट घ्या. बँक यासाठी जास्त कागदपत्रे मागत नाही आणि याची वेळेवर परतफेड केल्यास स्कोअर वाढतो.

लहान पर्सनल लोन: बँकेकडून अगदी कमी रकमेचे वैयक्तिक कर्ज घ्या. त्याचा हप्ता असा निवडा जो तुम्हाला सहज परवडेल. हे कर्ज मुदतीपूर्वी पूर्ण न भरता नियमित हप्त्यांनी संपवा, जेणेकरून तुमचा रेकॉर्ड चांगला दिसेल.

सह-अर्जदार (Co-applicant) बना: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून नाव नोंदवा. जर त्या कर्जाचे हप्ते जबाबदारीने आणि वेळेवर भरले गेले, तर त्याचा थेट फायदा तुमचा स्कोअर वाढण्यात होतो.

बँक बॅलन्स कडक ठेवण्यासाठी अतिरिक्त टिप्स

नियमित कर्ज व्यवहारांशिवाय तुम्ही दर 6 ते 12 महिन्यांनी स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट ऑनलाईन तपासून पाहावा. अनेकदा रिपोर्टमध्ये काही चुका किंवा चुकीची माहिती नोंदवली गेल्यामुळे स्कोअर कमी होतो, ती दुरुस्त करणे गरजेचे असते.

तसेच, पैशांची नड आहे म्हणून सतत वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करू नका. प्रत्येक अर्जाच्या वेळी बँक तुमच्या नावावर चौकशी (Hard Inquiry) करते, ज्यामुळे तुम्ही पैशांसाठी खूप हताश आहात असा संदेश बँकांकडे जातो आणि स्कोअर खराब होतो. थोडक्यात सांगायचे तर, केवळ जबाबदारीने कर्ज व्यवस्थापन करून आणि खर्चावर नियंत्रण ठेवून तुम्ही क्रेडिट कार्डशिवाय देखील मजबूत क्रेडिट हिस्ट्री तयार करू शकता.