Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unclaimed Financial Assets: तुमच्या हक्काचे विसरलेले पैसे शोधायचेत? बँक, शेअर्स, पीएफ आणि विम्यातील रक्कम परत मिळवण्याची

Unclaimed Financial Assets

Unclaimed Financial Assets: तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे हजारो रुपये बँक, पीएफ, शेअर्स किंवा विम्यात पडून आहेत का? विनादावा पडून असलेली ही रक्कम ऑनलाईन कशी शोधायची आणि ती कशी काढायची, याची सविस्तर माहिती.

Unclaimed Financial Assets: नोकरी बदलणे, घर बदलणे किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या गुंतवणुकीची माहिती मागे न राहणे, यामुळे देशातील कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी विनादावा पडून आहेत. अनेकांना हे माहीतच नसते की त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या पूर्वजांचे हजारो रुपये बँक खात्यात किंवा इतर योजनांमध्ये धूळ खात आहेत.

हा पैसा सिस्टीममधून शोधून तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सरकारकडून विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबातील कोणाचे विसरलेले पैसे शोधायचे असतील, तर विविध वित्तीय संस्थांमधून ते कसे काढायचे, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. बँक खात्यांमधील विसरलेल्या ठेवी कशा शोधायच्या?

जर एखाद्या बचत किंवा चालू खात्यात सलग 10 वर्षे कोणताही व्यवहार झाला नाही, किंवा फिक्स डिपॉझिट (FD) मॅच्युअर झाल्यानंतर 10 वर्षे ती रक्कम काढली नाही, तर बँक ते पैसे आरबीआयच्या 'डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड'कडे पाठवते.

शोधण्याची पद्धत: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यासाठी 'उद्गम' (UDGAM) नावाचे एक सोपे पोर्टल सुरू केले आहे.

असा करा क्लेम: या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे नाव, पॅन कार्ड किंवा इतर मूलभूत माहिती टाकून एकाच वेळी अनेक बँकांमधील बेवारस पडलेले पैसे शोधू शकता. रक्कम सापडल्यास, संबंधित बँकेच्या शाखेत केवायसी (KYC) कागदपत्रे जमा करून तुम्ही ती रक्कम परत मिळवू शकता.

2. शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील लाभांश कसा मिळवायचा?

अनेकदा जुन्या कागदी शेअर्सचे प्रमाणपत्र हरवल्यामुळे किंवा बँक खात्याची माहिती अपडेट न केल्यामुळे शेअर्सचा लाभांश (डिव्हिडंड) मिळत नाही. सलग 7 वर्षे असा लाभांश क्लेम केला नाही, तर तो कंपनीकडून 'इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड' (IEPF) कडे ट्रान्सफर केला जातो.

शोधण्याची पद्धत: म्युच्युअल फंडातील जुने पैसे किंवा लाभांश शोधण्यासाठी 'एमएफ सेंट्रल' (MF Central) किंवा कॅम्स (CAMS) आणि केफिनटेक (KFintech) च्या वेबसाईट्सची मदत घेता येते.

असा करा क्लेम: गुंतागुंतीचे शेअर्स आणि लाभांश परत मिळवण्यासाठी तुम्हाला 'IEPF'च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आवश्यक कागदपत्रे आणि कंपनीच्या पडताळणीनंतर हे शेअर्स किंवा पैसे तुमच्या डिमॅट आणि बँक खात्यात जमा होतात.

3. ईपीएफ (EPF) मधील पडून असलेला पैसा कसा काढायचा?

नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील पीएफचे पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर न केल्यामुळे किंवा ते न काढल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पैसे ईपीएफओ (EPFO) कडे पडून राहतात. जर पीएफ खात्यात सलग 3 वर्षे नवीन पैसे जमा झाले नाहीत, तर ते खाते 'इनॲक्टिव्ह' म्हणजेच निष्क्रिय मानले जाते.

शोधण्याची पद्धत: कर्मचाऱ्यांनी आपल्या युएएन (UAN) नंबरचा वापर करून ईपीएफओच्या सदस्य पोर्टलवर लॉगिन करावे.

असा करा क्लेम: जर जुन्या कंपनीचा पीएफ पडून असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तो सध्याच्या चालू पीएफ खात्यात ट्रान्सफर करू शकता किंवा पॅन कार्ड आणि आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा वापर करून ती रक्कम थेट बँक खात्यात काढून घेऊ शकता.

4. विमा पॉलिसीचे (Insurance) क्लेम कसे मिळवायचे?

विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर जर त्यांच्या वारसांनी क्लेम केला नाही, तर विम्याचे पैसे कंपन्यांकडेच पडून राहतात. ठराविक काळानंतर ही रक्कम 'सीनियर सिटीझन्स वेल्फेअर फंड'कडे वर्ग केली जाते.

शोधण्याची पद्धत: एलआयसी (LIC) किंवा इतर खाव्या कंपन्यांच्या वेबसाईटवर 'Unclaimed Amount' शोधण्याचा एक विशेष पर्याय असतो.

असा करा क्लेम: तिथे जाऊन पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबर टाकून शोध घ्या. जर पैसे सापडले, तर विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत जाऊन मूळ पॉलिसीचे कागदपत्र, ओळखपत्र आणि वारसदार असल्याचा पुरावा देऊन क्लेम फॉर्म जमा करावा लागतो.

पैशांचा हा शोध घेताना पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि जुनी पासबुक्स किंवा बॉण्ड्स जवळ ठेवावेत. जर मूळ खातेदाराचे निधन झाले असेल, तर कायदेशीर वारसदारांना मृत्यू दाखला (डेथ सर्टिफिकेट) आणि नातेसंबंधाचा पुरावा सादर करावा लागतो.

पैसे परत मिळवण्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाच्या नावावर असे पैसे सापडले, तर ते परत मिळवण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा:

स्टेप 1 (कागदपत्रे गोळा करा): क्लेम करण्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांसारखे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत ठेवा. जर मूळ खातेदार हयात नसेल, तर त्यांचा मृत्यू दाखला आणि कायदेशीर वारसदार असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.

स्टेप 2 (अर्ज दाखल करा): पैसे ज्या संस्थेकडे आहेत (उदा. बँकेची शाखा किंवा विमा कंपनीचे ऑफिस), तिथे जाऊन केवायसी (KYC) कागदपत्रांसह क्लेम फॉर्म जमा करावा लागतो.

स्टेप 3 (खात्यात पैसे जमा होणार): सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर संबंधित बँक किंवा कंपनी पडताळणी पूर्ण करून ती रक्कम थेट तुमच्या सध्याच्या चालू बँक खात्यात ट्रान्सफर करते. या प्रक्रियेसाठी काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो.