Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका व्यवसायातून विविध जोडधंदे उभारणारी उद्योजिका स्नेहलता सावरकर; मेहनतीला कल्पकतेची जोड

Oyster Mushrooms Business

Oyster Mushrooms Business: एका महिलेने मनात ठरवले तर ती काहीही करु शकते, याची प्रचीती स्नेहलता मनोज सावरकर यांनी उभारलेला मशरुमचा व्यवसाय आणि त्याच्या सोबतीला सुरु केलेले जोडधंदे बघून येते. मशरुम, गांडूळखत, 25 प्रकारचे विविध लोणचे आणि मशरुम पासून तयार केलेले विविध हेल्दी फूड प्रॉडक्ट्स असा सगळा एक मोठा व्यवसाय स्नेहलता सावरकर यांनी 5 वर्षात आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या बळावर सुरु केलाय.

Successful Business Story Of Snehalata Sawarkar: वर्धा जिल्ह्यातील करंजी काजी गावातील उद्योजिका स्नेहलता मनोज सावरकर यांची स्वत:ची दोन एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये त्यांनी मशरुम उत्पादन घेण्यासाठी 16 बाय 28, 16 बाय 35 असे दोन मशरुम प्लांट उभारले आहे. तर 15 बाय 15 चा एक स्टोरेज प्लांट उभारला आहे. त्यासह गांडूळ खत तयार करण्यास 9 टाकी देखील या शेतात उभारल्या आहेत. 

स्नेहलता सावरकर यांनी 2017 मध्ये मशरुमची शेती करण्यास सुरुवात केली होती. या पाच वर्षांमध्ये त्या आपली कल्पक्ता आणि मेहनतीच्या जोरावर लाखो रुपयांचा नफा मिळवित आहे. उद्योजिका स्नेहलता मनोज सावरकर यांनी सेलसूरा विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेवून मशरुम उद्योगास सुरुवात केली. त्यासोबत त्यांना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या उद्योगात त्यांचे पतीन मनोज सावरकर हे नेहमी सहकार्य करीत असतात. त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणून आज ओम साई मशरुम व्यवसाय वर्धेसह नागपूर जिल्ह्यात देखील परिचयाचा झाला आहे.

ओले आणि वाळलेले ऑयस्टर मशरुम

सध्या स्नेहलता यांच्याकडे 2000 बेडचा प्लांट आहे. त्यामध्ये त्या दररोज न चुकता मशरुमचे 40 बेड तयार करतात. मशरुमचे उत्पादन हातात मिळण्याचा कार्यकाळ हा 45 दिवसांचा असतो. स्नेहलता या ऑयस्टर मशरुम (Oyster Mushroom) चे उत्पादन घेतात. ऑयस्टर मशरुमला मराठीमध्ये 'ढींगरी मशरुम' म्हणतात. हे मशरुम तयार करण्यास प्रत्येकी बेड मागे 30 रुपयांची लागत (खर्च) लागते. त्यानंतर एका बेडपासून 1 किलो ओलं मशरुम मिळते. 1 किलो ओल्या मशरुमची किंमत 400 रुपये किलो आहे. तर वाळलेल्या मशरुमची किंमत 2000 रुपये किलो आहे. ओल्या आणि वाळलेल्या मशरुमच्या किंमतीमध्ये प्रचंड तफावत असते. 100 ग्रॅम ओल्या मशरुमचा पॅकेट 40 रुपयांना मिळतो. तर 25 ग्रॅम वाळलेल्या मशरुमचा पॅकेट 50 रुपयाला मिळतो, अशी माहिती स्नेहलता यांनी दिली.

गांडुळ खताचा व्यवसाय

मशरुम उत्पादनाचा 45 दिवसांचा कार्यकाळ संपल्यानंतर, संपूर्णपणे वापरुन (Utilities) झालेले कंपोस्ट खत ज्यामध्ये धान्याचा भुसा, पालापाचोळा, इत्यादी गोष्टींचा समावेश असतो, त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते. गांडूळ खत तयार करण्यासाठी  स्नेहलता यांच्याकडे 9 टाक्या आहेत. एक किलो गांडूळ खत 30 रुपये किलो प्रमाणे विकल्या जाते.

मशरुमपासून हेल्दी फूड्स

ओले मशरुम विक्री झाल्यानंतर उरलेल्या मशरुमला सोलर ड्रायरमध्ये वाळविल्या जाते. त्यानंतर काही ड्राय मशरुमचे भाजी बनविण्यास लागणारे पॅकेट तयार करुन, इतर मशरुम पासून विविध हेल्दी फूड प्रॉडक्ट्स तयार केल्या जाते. मशरुमवर आधारित ड्राय मशरुम, मशरुम पावडर, मशरुम लोणचे, मशरुम मुरब्बा, मशरुम चटपटा, मशरुम नॉनखटाई, मशरुम चटणी, मशरुम फेसपॅक अशी विविध उत्पादने तयार करुन आज विक्रीस उपलब्ध आहेत.

लोणच्याचा व्यवसाय

त्याचप्रकारे, स्नेहलता यांनी जोडधंदा म्हणून लोणच्यांचा व्यवसाय देखील सुरु केलाय. त्या कमीत कमी 25 प्रकारची विविध लोणची विकतात. मेथीचे लोणचे, कवटाचे, बेलाचे लोणचे, फणसाचे, लसणाचे, लिंबूचे, कारल्याचे, अद्रकचे लोणचे, इत्यादी अनेक प्रकारचे तिखट आणि गोड अश्याप्रकारे विविध चविच्या लोणच्यांची विक्री स्नेहलता करतात. मशरुम आणि गांडूळ खताच्या माध्यमातून सुरुवातीला दोन वर्ष केवळ दोनच लाखाचे वार्षिक उत्पन्न झाले. परंतु, त्यानंतर मशरुम हेल्दी प्रॉडक्ट्स आणि लोणच्यांच्या जोडधंद्याची साथ लाभल्याने आता 7 लाखांच्या वर वार्षिक नफा होत असल्याची माहिती स्नेहलता यांनी दिली.