पीपीएफ, पोस्टाच्या बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणूक योजना अशा अल्प बचतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. ही डेडलाईन चुकवली तर ही गुंतवणूक गोठवली जाण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी चार दिवसांत गुंतवणूकदारांना आधार आणि पॅनकार्ड सादर करावे लागणार आहे.
अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या योजना खासकरुन कर बचतीच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने गुंतवणूकदार याला पसंती देतात. मात्र या योजना सुरु ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
अल्प बचत योजनांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वीच सादर केले असेल तर त्यांना पुन्हा देण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारकडून येत्या 30 सप्टेंबर 2023 रोजी अल्प बचत योजनांचा ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी व्याजदर जाहीर केला जाणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत अल्प बचतीवरील व्याजदरात 0.10 ते 0.30% इतकी वाढ केली होती.
दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिटचा व्याजदर 0.10% ने वाढला होता. पाच वर्ष मुदतीच्या रिकरिंग डिपॉझिटचा व्याजदर 0.30% ने वाढला होता. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना या गुंतवणूक योजनांचा व्याजदर जैसे थेच ठेवला होता.