इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या EV मध्ये पदार्पण करत आहेत. स्कोडा कंपनी पुढील वर्षी इव्ही कार निर्मिती करणार आहे. भारतीय बाजारामध्ये स्कोडा Enyaq iV ही पहिली गाडी आणणार आहे. सुरुवातीला काही दिवस कंपनी गाड्या आयात करणार आहे. मात्र, त्यानंतर भारतामध्ये निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.
स्कोडा कंपनीच्या गाड्यांना भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. कंपनीने इंडिया २.0 ही रणनीती गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी आखली होती. चालू वर्षात वाहन विक्रीत दोन अंकी वाढ साधण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत कंपनीने भारतामध्ये १ लाख गाड्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२२ सालात कंपनीने भारतामध्ये सुमारे ५३ हजार ७२१ गाड्यांची विक्री केली होती. २०२१ च्या तुलनेने ही वाढ १२५ टक्के आहे. जर्मनी, चेक रिपब्लिक नंतर भारतामध्ये सर्वात जास्त स्कोडा कंपनीच्या गाड्यांची विक्री होते.
सेमिकंडक्टरच्या तुटवड्यामुळे आणि महामंदीच्या परिणामामुळे युरोपातील बाजारात मंदी आली आहे. येत्या काही दिवसांत चेक रिपब्लिकला मागे टाकून भारत स्कोडा कारच्या विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर येईल, अशी आशा कंपनीचे ब्रँड संचालक पिटर स्लोक यांनी म्हटले. मागील वर्षी फक्त भारत हे असे एकमेव मार्केट होते जेथे कारची उच्चांकी विक्री झाली.
येत्या काही दिवसांत Kodiaq, Kushaq आणि Slavia या गाड्यांची स्पेशल एडिशन बाजारात येणार आहेत. तर सुपर्ब आणि ऑक्टाविया या गाड्यांचे BS6 नियमांचे पालन करत पुढील व्हर्जन लाँच करण्यात येणार आहे. सध्या स्कोडा कंपनी भारतातील १४० शहरांमध्ये कार विक्री करते. पुढील काळात हे नेटवर्क आणखी वाढवण्यात येणार आहे. SUV गाड्यांची विक्री दिवसेंदिवस वाढत असताना सेडान श्रेणीतील गाड्यांच्या विक्रीसाठी स्कोडा आश्वासक आहे.