Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भरमसाठ खर्च करून MPSC Exam च्या तयारीसाठी पुण्यात जावे का? जाणून घ्या प्रति विद्यार्थी किती खर्च येतो!

Is Pune necessary for MPSC

Image Source : www.cnbctv18.com

Pune MPSC UPSC Classes : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये MPSC आणि UPSC exam च्या तयारीसाठी पुण्यात जाण्याचा ट्रेंड नवा नाही. पण पुण्यात राहून एमपीएसएसी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला साधारण किती खर्च येऊ शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

Is  Pune Necessary for MPSC : MPSC च्या परीक्षांमधून पोस्ट मिळवायची तर पुण्यात जाऊनच अभ्यास करायला हवा असे मानणारे अनेक जण असतात. त्याचवेळी याच्या अगदी विरोधी मत मांडणारे विद्यार्थी किंवा शिक्षक देखील बघायला मिळतात. यातली वस्तुस्थिती तपासताना यातील आर्थिक मुद्देदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. पुण्यात राहण्याचा आणि MPSC च्या परीक्षांची तयारी करायचा किती खर्च होऊ शकतो? पुण्यात राहून तयारी केली म्हणून काही अतिरिक्त फायदा होतो का? हे पाहणे देखील आवश्यक ठरते.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये MPSC आणि UPSC च्या तयारीसाठी पुण्यात जाण्याचा ट्रेंड नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरु आहे. पदवीची तयारी करत असताना ती पूर्ण केल्यावर पुण्यात येऊन राहण्याचा विचार अनेक विद्यार्थी करत असतात. त्याचा काही अधिकचा फायदा असतो की नाही ते आपण बघणारच आहोत. मात्र सर्वसाधारणपणे विद्यार्थी पुण्यात येतात तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टींसाठी खर्च करावा लागतो आणि तो किती खर्च येऊ शकतो ते आधी पाहुया.

विद्यार्थ्यांना कशावर खर्च करावा लागतो?

पुण्यात अभ्यास किंवा MPSC-UPSC साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च हा प्रामुख्याने राहणे, नाष्टा-जेवण आणि क्लास हाच असतो. यात क्लास लावणे न लावणे हे ऐच्छिक आहे. पण, पुण्यात येऊन अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी किमान तयारीच्या पहिल्या वर्षी तरी क्लास लावतात, असे दिसून येते. किंबहुना याचसाठी बहुतांश विद्यार्थी पुण्यात आलेले असतात.

पुण्यात राहण्याचा खर्च किती (Cost of living in Pune, 2022)

पुण्यात MPSC-UPSC साठी जे विद्यार्थी येतात ते सामान्यपणे नवी पेठ, सदाशिव पेठ या भागात राहण्याला प्राधान्य देतात. नवी पेठपासून सदाशिव पेठेपर्यंत जाताना 2 हजारांपासून ते 3,500 रुपयांपर्यंत PG (Paying Guest) मिळू शकते. नव्या पेठेत 2 हजार ते 2100 रुपयात सध्या PG उपलब्ध आहेत. पण, यात फक्त गादी मिळते. कॉट, लॉकर या सुविधा मिळत नाहीत. बहुतेक पीजीवाले म्हणजेच रूम ओनर्स एक ते दोन महिन्यांचे भाडे डिपॉझिट म्हणून घेतात.

MPSC Aspirant चापुण्यातयेणारासध्याचाअंदाजितखर्च

खर्चाचेघटक

खर्चरुपयांत

राहणे ( PG)

2 हजार   ते   3 हजार   500

मेस

2200 ते   2600 (मासिक   2 वेळ )

लायब्ररी

500 ते   1500 (मासिक )

क्लास

5 हजार   ते   1 लाख   रुपये ( सिंगल   विषय   ते   पूर्ण   बॅच )

टेस्ट   सिरिज

1 ते   3 हजार ( प्रत्येक   परीक्षेनुसार   बदल   होऊ   शकतो .)

MPSC क्लासेसचा खर्च किती? (MPSC Class Expenses in Pune)

MPSC व UPSC क्लासेसच्या खर्चाचा निश्चित आकडा सांगणे कठीण आहे. कारण प्रत्येक क्लासेसची फी ही वेगवेगळी असते. त्यात काही जण पूर्ण बॅच लावतात तर काही जण ठराविक विषयांसाठीच फक्त क्लास लावतात. तरीही साधारण एका विषयाच्या 2-3 महिन्याच्या बॅचची फी 4 ते 5 हजार इतकी असते. आणि तुम्ही जर संपूर्ण बॅच जॉईन केली तर राज्यसेवेची फी सध्या एका लाखाच्या जवळपास आहे. MPSC Combine साठी ही फी तुलनेने कमी असते. यामध्ये आता MPSC राज्यसेवा ही परीक्षा 2023 पासून UPSC च्या धर्तीवर वर्णनात्मक स्वरूपाची झाली आहे. यामध्ये वैकल्पिक (ऑप्शनल) विषय देखील समाविष्ट करण्यात आला आहे. ऑप्शनल विषयाची फी 25 हजारापर्यंत असल्याचे दिसून येते. यामुळे MPSC 2023 राज्यसेवा या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा खर्च आणखी वाढणार आहे.

टेस्ट सिरीजचा खर्च 1 ते 3 हजार! (MPSC Test Series Cost?)

विद्यार्थ्यांना स्वतः पुस्तके वाचून संकल्पना समजून घेता येत असतील तर, फक्त टेस्ट सिरीज लावण्याचा, पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. टेस्ट सिरीजचा खर्च 1 ते 3 हजारापर्यंत येतो. हे झाले MPSC Prelims च्या टेस्ट सिरीजविषयी. MPSC new pattern प्रमाणे मुख्य वर्णनात्मक परीक्षेचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्याची फी किती असेल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल. ऑनलाईन क्लासेसचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्याची फी ऑफलाईनच्या तुलनेत कमी असते.

लायब्ररीचा खर्च किती येतो? (Library Cost?)

जे विद्यार्थी क्लास लावत नाहीत; असे बहुतांश विद्यार्थी अभ्यासिका (Library) लावतात. अभ्यासिकेची दरमहा फी 500 रुपयांपासून दीड ते दोन हजारापर्यंत असते. एसी किंवा इतर सुविधा जसे की, पार्टिशन, मोबाईल, लॅपटॉप चार्जसाठी स्वतंत्र सुविधा देणाऱ्या अभ्यासिकांची फी जास्त असू शकते.

मेसचा खर्च किती येतो? (Mess Cost?)

एका विद्यार्थ्याचा एकावेळचा मेसचा खर्च हा 1300 ते 1500 रुपये आणि दोन्ही वेळचा साधारणपणे खर्च 2200 ते 2500 रुपये या दरम्यान असतो. नॉनव्हेजसाठी 100 ते 200 रुपये जास्त मोजावे लागतात. जिथे अभ्यासिका, क्लासेस वगैरे आहेत; तिथे सकाळी पोहे, उपीट, खिचडी, इडली, उकडलेली धान्ये आदी डिश 15 ते 25 रुपयांमध्ये उपलब्ध असतात.

एवढा खर्च करून MPSC साठी पुण्यात राहावे का?

आता आपण पाहिले की, एखाद्या विद्यार्थ्याने क्लास नाही लावला तरी पुण्यात येऊन अभ्यास करायचा म्हटले की, त्याच्या किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी 6 ते 8 हजार रुपये लागतात. बाकीचा खर्च वेगळा! असे असताना पुण्यात जायचे कशाला? क्लास काय फक्त पुण्यात असतात? असे प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. आणि तो चुकीचा देखील नाही.

पुण्याबाहेर राहूनही यश मिळवता येते!

पुण्याबाहेर राहून देखील चांगला अभ्यास करता येतो. एखाद्या गावात जिथे फारशा सुविधा नाहीत, अशा ठिकाणी राहूनही यश मिळवल्याच्या विद्यार्थ्यांच्या कथा ( MPSC success stories ) तुम्ही ऐकल्या असतील. छोट्या शहरात देखील क्लास, लायब्ररी उपलब्ध होतात. यू ट्यूबवर तर अमर्याद व्हिडिओ उपलब्ध आहेत. MPSC syllabus मधील विशेषत: पूर्व परीक्षांमधील असा एखादा उपघटक (सबटॉपिक) सापडणे कठीण की ज्यावर यूट्यूबवर व्हिडिओ लेसन नाही. तरीही आवश्यकता वाटत असल्यास ऑनलाईन क्लासेसचा पर्याय आहेच.  यामुळे MPSC मध्ये यश मिळवायचे तर पुण्याला जायलाच हवे असे नाही.

मग पुण्यात का जावे? 

राज्यभरात असे बरेच MPSC Aspirant दिसतील की, ज्यांना पुण्यात येऊनच MPSC करायची असते आणि हा निर्णय अगदी चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. इथे येऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे असते की,  MPSC चे इथे आहे तसे वातावरण गावाकडे मिळत नाही. इथे सर्वोत्तम क्लासेस आहेत, असाही दावा केला जातो. उत्तम क्लासेस हा एक स्वतंत्र आणि वादग्रस्त विषय आहे. त्याला अनेक पदर आहेत. पण, राज्यभर प्रसिद्ध असलेले मोठ-मोठे क्लासेस पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. ही वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही आणि पुण्यात राहून स्पर्धेच्या तीव्रतेचा अधिक चांगला अंदाज येतो, या म्हणण्यात देखील तथ्य आहे.

हे सगळं लक्षात घेतल्यावर असं म्हणता येईल की इथे येऊन अभ्यास करण्याचे काही फायदे जरूर आहेत. MPSC Preparation च्या प्रवासाची ही एक वेगळी मौज देखील असते. यामुळे असा कुणी निर्णय घेत असेल तर चुकीचा म्हणता येत नाही. मात्र MPSC तून पोस्ट मिळवायची तर पुण्यात यायलाच लागते गावाकडे किंवा आपल्या शहरांत राहून ते शक्य नाही, असे कुणी म्हणत असेल तर तसे मात्र नक्की नाही. स्वतःच्या घरी अभ्यास करून आणि फुल टाईम जॉब करूनसुद्धा कित्येक जणांनी गॅझेटेड पोस्ट मिळवल्या आहेत.

थोडक्यात, MPSC साठी पुण्यात जायचं की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. आपली आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जवाबदाऱ्या याचा सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य ठरू शकेल.