मुंबई म्हणजे चंदेरी दुनिया, स्वप्नांचे शहर! मुंबई बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी अनेकजण या मायानगरीला भेट देत असतात. इथे आल्यानंतर प्रत्येकाला धडकी भरते ती इथल्या गर्दीने. मुंबईत जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जर तुम्हांला खाजगी किंवा सार्वजनिक वाहतुकीपैकी कुठल्या एका पर्यायाचा विचार करायचा असल्यास कुठला पर्याय निवडावा? कुठला पर्याय अधिक किफायतशीर आणि बचतीचा ठरू शकतो हे आपण या लेखात बघणार आहोत.
खरे तर हा प्रश्न मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी आणि मुंबई फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी कायम महत्वाचा राहिला आहे. मुंबईचा विस्तार, मुंबईतील वाहतूक कोंडी या सगळ्यांचा विचार केला असता खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मर्यादा आणि उपलब्धी आपल्याला समजून येईल.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक, ज्यामध्ये उपनगरीय रेल्वे व्यवस्था, बसेस आणि मेट्रो यांचा समावेश होतो. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परवडणाऱ्या आहेत. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुंबई लोकल’ ची तर गोष्टच निराळी. 10 ते 35 रुपयांत लोकल ट्रेनने तुम्ही कुठेही प्रवास करू शकता.
लोकल ट्रेनने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईची गर्दी, ट्रेनमधील गर्दी ही मुंबईकरांना सवयीची झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबईत नवीन असाल किंवा पर्यटनासाठी आला असाल तर सकाळी 11 ते 5 दरम्यान प्रवास करा, यावेळेत लोकलला गर्दी कमी असते. तसेच रात्री 9 ते 12 पर्यंत देखील तुम्ही प्रवास करू शकता, यावेळीही गर्दी तुलनेने कमी असते. तसेच एका दिवसाचा ‘पर्यटन पास’ केबल 80 रुपयांत तुम्हाला काढून मिळेल, त्यात तुम्ही दिवसभर मुंबईत कुठेही लोकल ट्रेनने फिरू शकाल.
बेस्ट बसचा देखील तुम्ही वापर करू शकता, 5 रुपये ते 30 रुपयांपर्यंत तिकीट घेऊन तुम्ही बेस्ट बसचा अनुभव घेऊ शकता. तसेच मुंबईत मीटर रिक्षा आणि शेयरिंग रिक्षा असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
सार्वजनिक वाहतुकीचा विचार केल्यास तुमचे पैसे तर वाचतातच पण सोबतच तुमचा प्रवासाचा वेळ देखील वाचतो. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करून तुम्ही नकळत पर्यावरणाची देखील काळजी घेत असता. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी अनेकजण सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करतात.
मुंबईतील खाजगी वाहतुक
खाजगी वाहने कोणत्याही वेळी प्रवास करण्याची आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे सहज उपलब्ध नसलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची सुविधा देतात. हा प्रवास आरामदायी असला तरीही खर्चिक आहे. मुंबईतील गर्दी लक्षात घेता गाडीने प्रवास करणे महाग आणि वेळकाढू ठरू शकते. पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता अनेकजण सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करणे पसंत करतात.
याशिवाय मुंबईत मोफत पार्किंगची व्यवस्था फार तुरळक प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक ठिकाणी ‘Pay and Park’ अशीच व्यवस्था आहे. त्यामुळे पार्किंगचा खर्च तुलनेने अधिक आहे. याशिवाय चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली तर वाहतूक पोलिस तुमच्यावर दंड आकारतील तो वेगळाच. त्यामुळे तुम्ही तुमची गाडी घेऊन मुंबईत फिरायला येणार असाल तर गाडी पार्किंगची समस्या तुम्हांला सतावू शकते हे लक्षात असू द्या. पार्किंगचा, इंधनाचा आणि वाढत्या गर्दीचा विचार केल्यास तुम्हांला मुंबईतील खाजगी वाहतूक महागात पडू शकते.
मुंबईत ओला, उबर असे वाहतूक व्यवस्थेचे खाजगी पर्याय उपलब्ध आहेत. परंतु दूरच्या प्रवासासाठी हा पर्याय फारच खर्चिक ठरू शकतो.
मुंबईत सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीचे पर्याय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सार्वजनिक वाहतूक सामान्यत: खर्च, सुविधा आणि गर्दी टाळण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी आहे, त्यामुळे सामान्य लोक याला पसंती देतात.असे असले तरी गरजेनुसार लोक खाजगी वाहतूक व्यवस्थेचा देखील वापर करतात.