लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप खरेदी करावा असा प्रश्न तुम्हांला कधी ना कधी तर पडलाच असेल. लॅपटॉप आणि डेस्कटॉप या दोन्ही कम्प्युटर्सचे स्वतःचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादा आहेत. या दोघांपैकी कुठला पर्याय अधिक किफायतशीर ठरेल आणि पैसे वाचवणारा ठरेल हे या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
पोर्टेबिलिटी महत्वाची…
लॅपटॉप युजर्सला पोर्टेबिलिटीचा फायदा देतात, ज्यामुळे तुम्ही जिथे असाल तेथून लॅपटॉपचा वापर करू शकाल मात्र डेस्कटॉपच्या बाबतीत तो पर्याय तुम्हांला मिळत नाही. म्हणूनच डेस्कटॉपच्या तुलनेत लॅपटॉप अधिक महाग असतात. पोर्टेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन तुम्ही कुठला पर्याय निवडायचा याचा विचार करू शकता.
जर तुमचा वापर घरूनच जास्त होणार असेल तर लॅपटॉप खरेदीच्या मागे जाण्यात काहीही अर्थ नाही. मात्र तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि त्याचवेळी तुम्ही कुठे बाहेरगावी प्रवास करणार असाल तर त्यावेळी लॅपटॉपचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. मात्र त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील हे लक्षात घ्या.
प्रारंभिक गुंतवणूक कुठे जास्त?
प्रारंभिक खर्चाच्या बाबतीत विचार केल्यास, डेस्कटॉप संगणक सामान्यत: कमी पैशात बेस्ट फीचर्स आणि चांगली गुणवत्ता देतात. आजही अनेक युजर्स लॅपटॉप ऐवजी डेस्कटॉपलाच पसंती देतात कारण ते वापरायला सहजसोपे असतात. मात्र लॅपटॉपच्या बाबतीत तो हाताळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
तुम्ही मिड-रेंज लॅपटॉपवर जितकी रक्कम खर्च करू शकता तितक्याच रकमेवर तुम्ही अधिक बेस्ट फिचर असलेला डेस्कटॉप मिळवू शकता हे लक्षात घ्या.
डेस्कटॉप त्यांच्या अपग्रेडेबिलिटीमुळे दीर्घकाळात अधिक किफायतशीर ठरते हा मुद्दादेखील लक्षात असू द्या. तुम्ही डेस्कटॉपचे RAM, ग्राफिक्स कार्ड्स (Grahics Card) आणि स्टोरेज ड्राइव्हस् (Storage Drive) सारखे घटक सहजपणे बदलू शकता. तंत्रज्ञान जसजसे अपडेट होईल तसतसे बदल तुमच्या डेस्कटॉपमध्ये तुम्हांला करता येतील, लॅपटॉपच्या बाबतीत मात्र हे पर्याय मर्यादित आणि अधिक खर्चिक असतात.
दुरुस्ती आणि देखभाल खर्च
देखभाल आणि दुरुस्तीच्या बाबतीत, लॅपटॉप अधिक महागडे ठरू शकतात. लॅपटॉपच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे त्याची दुरुस्ती आशिक खर्चिक असते. मात्र डेस्कटॉपच्या बाबतीत हा खर्च कमी असू शकतो.
लॅपटॉप सामान्यत: डेस्कटॉपपेक्षा कमी वीज वापरतात, ज्यामुळे वीज बिल कमी येते. मात्र डेस्कटॉप वापरताना अधिक वीज वापरली जाते, त्यामुळे वीज बिलात वाढ होऊ शकते.
लॅपटॉप पोर्टेबल असल्यामुळे, लॅपटॉपचा वापर अधिक होतो, त्यामुळे त्याची अनेकदा दुरुस्ती करावी लागू शकते. मात्र तुलनेने डेस्कटॉपची योग्यरित्या देखभाल केल्यास तो दीर्घकाळ चालू शकतो.
वापरावर ठरवा पर्याय
लॅपटॉप आणि डेस्कटॉप या दोघांमधून कुठला पर्याय निवडावा हे सर्वस्वी तुमच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. वेब ब्राउझिंग, वर्ड प्रोसेसिंग आणि लाइट मल्टीमीडिया वापर यासारख्या कामांसाठी तुम्हाला कॉम्प्युटरची आवश्यकता असल्यास, बजेट-फ्रेंडली लॅपटॉप तुमच्यासाठी पुरेसा असू शकतो.
मात्र, व्हिडिओ एडिटिंग, गेमिंग किंवा ग्राफिक डिझाइन यासारख्या कामांसाठी, हाय प्रोसेसिंग पॉवर आणि डेडीकेटेड ग्राफिक्स क्षमता असलेला डेस्कटॉप चांगली कामगिरी करू शकेल, हे लक्षात घ्या.
लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी करण्याचा निर्णय तुमच्या वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यक्रमांवर अवलंबून असतो. लॅपटॉप पोर्टेबिलिटी आणि सहज वापराच्या सुविधा देतो. तर डेस्कटॉप अनेकदा कार्यप्रदर्शन, अपग्रेडेबिलिटी आदींच्या बाबतीत सोयीस्कर ठरू शकतात. तुमचा वापर कसा असणार आहे आणि बजेट किती आहे यावर तुम्ही तुमचा पर्याय ठरवू शकता.