आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर चांगला पर्याय आहे तो म्हणजे विम्याचा. त्यासाठी विमा घेताना जास्त सावधानता बाळगत योग्य तो विमा घेणं गरजेचं असतं. मात्र, हा विमा कोणत्या पद्धतीने काढायचा असा प्रश्न आपल्यासमोर उभा असेल. विमा एजंटच्या मार्फेत काढायचा की डायरेक्ट विमा कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन काढायचा. जसं प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतात तसेच डायरेक्ट प्लान की एजंटमार्फेत विमा काढायचा याचे सुद्धा काही फायदे-तोटे आहेत. हे फायदे-तोटे तुम्ही प्रथम समजून घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या.
IRDAI ने अलीकडेच विमा कंपन्यांना डिरेक्ट प्लान आणण्याची परवानगी दिली. याचाच अर्थ, तुम्ही आता थेट विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या प्लानमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला विम्यासाठी एजंट किंवा मध्यस्थाची गरज नाही. यात तुमचा सरळ फायदा असा की, एजंटला दिलं जाणारं कमिशन वाचतं. आणि पर्यायाने तुम्हाला विम्याचा हफ्ता कमी बसतो.
हे ऐकायला छान वाटतं. पण, त्याचबरोबर अनेकदा एजंटचा आपल्याला उपयोग होत असतो. एकतर आपण विमा योजनेची नीट माहिती घेतलेली नसते. कुठल्या प्रकारचा विमा घ्यावा ही माहितीच आपल्याला अनेकदा एजंट देत असतो. शिवाय काही प्रकारच्या इतर सेवा आणि सुविधाही देतो.
मग अशावेळी डायरेक्ट प्लान घ्यावा की न घ्यावा. असा प्लान आणि एजंट मार्फत घेतलेली पॉलिसी यांच्यात तुलना करून बघूया.
Table of contents [Show]
विमा संदर्भात संपूर्ण माहिती
विमा घेताना कोणकोणते विम्याचे प्लान्स आहेत, कोणत्या विम्याचा काय फायदा आहे काय तोटा यासह आपण नक्की किती किंमतीचा विमा घ्यावा यासंदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर आपण एजंटच्या मार्फेत विमा घेत असू तर त्या एजंटतर्फे आपल्याला या सगळ्या खाचाखोचाविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं जातं. आपण त्यांना सगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करू शकतो. मात्र, तेच जर आपण डायरेक्ट संकेतस्थळावरून विमा काढत असू तर ही सगळी माहिती आपल्याला आपली जमा करावी लागते. समजून घ्यावी लागते. येथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणि नसतं. त्यामुळे भविष्याचा विचार करता आपण नक्की किती किंमतीचा विमा घ्यावा हे सुद्धा आपल्यालाच ठरवावं लागतं.
हा मुद्दा विमा तज्ज्ञ दत्तात्रय काळे यांनी एका उदाहरणाने समजावून सांगितला. ते म्हणाले, ‘फक्त विम्याचीच माहिती नाही, तर आपल्या गरजेसाठी नेमका किती रकमेचा विमा काढला पाहिजे हा अंदाजही अनेकदा ग्राहकांना नसतो. आणि ते ठरवायलाही एजंट आपल्याला मदत करतो. आपलं सध्याचं वय, कौंटुंबिक जबाबदाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न यांचा अंदाज घेऊन स्वत:चं स्वत: विम्याची रक्कम आणि प्रकार ठरवता आला तर एजंटकडे जाण्याची गरज नाही. नाहीतर एजंटची मदत घेतलेली योग्य ठरते,’ असं काळे यांनी महामनीशी बोलताना सांगितलं.
विम्याची रक्कम व मेडिकल प्रमाणपत्राचा संबंध
आज ऑनलाइन पद्धतीने विमा काढण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, एजंटच्या मदतीशिवाय आपल्यासाठी योग्य पर्याय निवडताना आपली दमछाक होऊ शकते. डायरेक्ट पद्धतीने विमा काढताना आपल्याला मेडिकल प्रमाणपत्र द्यावं लागत नाही. त्याऐवजी फॉर्ममध्ये जे प्रश्न विचारलेले असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. यामध्ये तुम्ही सिगारेट पिता का, दारू पिता का, तुमचं वजन, काही आजार वैगेरे असे सगळे प्रश्न असतात. जेव्हा आपण एजंटशिवाय विमा घेतो तेव्हा आपण ऑनलाइनवर खरी माहिती देतो की चुकीची हे पाहायला कोणी नसतं. या माहितीची शाश्वती नसल्याने ऑनलाइन पद्धतीने जेव्हा आपण विमा घेतो तेव्हा विमा रकमेला (Policy Coverage) ला सुद्धा आपोआप मर्यादा येतात.
मात्र, जेव्हा आपण एजंट मार्फेत विमा घेतो तेव्हा आपली मेडिकल चाचणी केली जाते. अशा पद्धतीने विमा घेताना एजंटमार्फेत आपल्याला विविध विम्याचे पर्याय दिले जातात. जरी कोणता आजार असेल तरी अधिक प्रिमियम भरून ही आपल्याला तो विमा घेता येतो. यामध्ये एजंटद्वारे मध्यस्थी केली जात असल्याने आपल्याला अधिक रकमेचे विमा मिळत असतो.
प्रिमिअम व कमिशन
कोणत्याच सोई-सुविधा या मोफत नसतात. तेव्हा एजंटद्वारे जेव्हा आपण विमा घेत असतो तेव्हा निश्चितच आपल्याला फी द्यावी लागते. ही फी आपल्याकडून थेट घेतली जात नाही. आपण जे प्रिमियम भरत असतो त्यामध्येच ही कमिशनची रक्कम समाविष्ट केलेली असते. त्यामुळे प्रिमियमच्या किंमती वाढतात. त्याउलट जेव्हा आपण डायरेक्ट प्लाननुसार विमा घेतो तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचं कमिशन द्यावं लागत नाही. त्यामुळे प्रिमियमची रक्कम ही कमी होते. तसेच नुकताच भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाकडून सर्व विमा कंपन्यांना डायरेक्ट प्लानने विमा घेणाऱ्यांना प्रिमियमवर सवलत देण्या संदर्भात निर्देश दिले आहेत.
पॉलिसी ट्रॅकिंग
एजंटमार्फेत विमा घेतल्यावर आपल्याला आपल्या विम्याचा प्रिमियम कधी भरायचा आहे याची योग्यवेळी आठवण करुन दिली जाते. त्यामुळे आपले प्रिमियम चुकत नाहीत. मेडिक्लेममध्ये आपल्याला जर दावा करायचा असेल तर एजंटला सगळी बिलं पुरवल्यावर ते ही सहजपणे होतं. मात्र, हेच जर आपण डाटरेक्ट प्लानने विमा घेतला तर प्रिमियम भरण्याची तारीख, पॉलिसी क्लेम करण्याची प्रक्रिया अशा सगळ्या गोष्टी स्वत:ला कराव्या लागतात.
तेव्हा जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल, विम्यातील सगळ्या खाचाखोचा तुम्हाला समजत असतील तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट प्लान नुसार ऑनलाईन पद्धतीने विमा घेऊ शकता. मात्र, जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल, वेळ नसेल तर अवश्य एजंटची मदत घेऊन योग्य तो विमा घेऊ शकता.