कोरोनाची भीती संपल्यानंतर भारतातील प्रमुख शहरांतील बाजारपेठा खुलून गेल्या आहेत. सध्या तर लग्नसराईचा काळ असल्यानं प्रत्येक शहरातील प्रमुख बाजारात उभं राहायलाही जागा मिळत नाही. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत जशी उलथापालथ झाली त्याचा परिणाम शॉपिंग मार्केटवरही पाहायला मिळत आहे. 2022 सालात काही महत्त्वाच्या बाजारपेठांतील दुकानांच्या भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आमच्या शॉपिंग बजेटवर होत आहे.
देशातील प्रमुख शॉपिंग स्ट्रिटवर भाडेवाढ( Rent hike in prominent shopping street in india)
दिल्लीतील खान मार्केट, चांदणी चौक मार्केट, जनपथ मार्केट तसेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, हिल रोड बांद्रा, कुलाबा Causeway मार्केटसह देशातील प्रमुख शॉपिंग स्ट्रीटमधील दुकांनाची भाडेवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कमर्शियल रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी Cushman & Wakefield यांनी केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात भाडेवाढ होत असली तरी ग्राहकांचाही ओढाही शॉपिंगसाठी आहे. त्यामुळे दुकानदारही जास्त भाडे देण्यास तयार आहेत. तसेच नवीन शॉप सुरू होण्याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, याचा बोजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर पडत आहे.
कोणत्या शहरातील शॉपिंग मार्केटमधील भाडेवाढ वाढली? (Cities where shop rent hiked)
अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु, मुंबई, चेन्नई, दिल्ली या शहरांमधील प्रमुख शॉपिंग स्ट्रीटवरील दुकानांचे भाडे 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सोबतच मॉलचे भाडेही वार्षिक 10% दराने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेने शहातील केंद्रस्थानी असलेल्या शॉपिंग स्ट्रिटवरील भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत. बंगळुरु शहरातील ब्रिगेड रोड, कमर्शियल स्ट्रिट, विठ्ठल माल्या रोड, इंदिरानगर पूर्व, कोरोमंगला, दक्षिण बंगळुरुतील जयानगर या भागातील बाजारपेठेतील दुकानांचे भाडे 50% पर्यंत वाढली आहेत.
ग्राहकांवर कसा होणार परिणाम? (How shop rate hike impacts consumer)
शहरातील गजबजीच्या मार्केटमधील दुकांनाचे भाडे आधीच जास्त असते. त्यात 2022 पासून आणखी भाडेवाढ झाल्याने दुकानदारांचा खर्चही वाढणार आहे. दुकानाचे भाडे, लाईटबील, कामगारांचा पगार, फर्निचर यासह इतर मेंटनन्सच्या खर्चाचाही यात समावेश आहे. हा सर्व खर्च मालाच्या किंमतीतून काढण्याचा प्रयत्न दुकानदारांकडून होतो. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगूती वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मॉलमध्ये या सगळा खर्च वस्तूच्या किंमतीत समाविष्ट केलेला असतो. आता छोटे दुकानदारही जास्त खर्च होत असल्याने वस्तुंच्या किंमती वाढवतील. त्याचा परिणाम ग्राहकांना खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. आधीच महागाईने ग्राहक त्रस्त असल्याने भाडेवाढीमुळे शॉपिंगही सर्वसामांन्यांच्या हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.