• 02 Oct, 2022 09:38

मान्सून सेलमध्ये शॉपिंग करताय, मग हे नक्की वाचा!

sale discount monsoon shopping

पावसाळ्यात स्ट्रीट मार्केटपासून ते शॉपिंग मॉलमधील मोठमोठ्या ब्रॅण्ड्सवरही ऑफर लागतात. या मॉन्सून ऑफर्स लहान-मोठ्यांपासून सर्वांनाच आकर्षित करत असतात.

पावसाळा सुरू झाला की, खरेदी ओघाने येतेचं. त्यात पावसाळ्यातील खरेदी म्हणजे ट्रेंडिंग खरेदी. या ट्रेंडिंग खरेदीमुळे बऱ्याच ठिकाणी ‘मॉन्सून ऑफर’ दिसतात. अगदी स्ट्रीट मार्केटपासून ते शॉपिंग मॉलमधील मोठमोठ्या ब्रॅण्ड्सवर ऑफर लागलेल्या दिसतात. त्यामुळे लहान-मोठ्यांपासून सर्वांनाच मॉन्सून सेल आकर्षित करतो. पण या सेलमध्ये दिल्या जाणाऱ्या डिस्काऊंटवर लक्ष न ठेवता खरेदी केली तर सेलच्या नादात तुमच्या बजेटची पुरती वाट लागू शकते.

पूर्वी पावसाळ्यातील शॉपिंग म्हणजे जास्तीतजास्त भटकंती व्हायची आणि एखादी वस्तू आवडलीच तर तीही घासाघीस करून घेतली जायची, अशी शॉपिंगची मजा होती. दिवसभर मॉलमध्ये फिरून, विंडो शॉपिंग व्हायची. पण आता पावसाळ्यातील शॉपिंगचा ट्रेंड पूर्ण बदलला आहे. कारण एकूणच शॉपिंग ट्रेंडमध्ये ऑनलाईन शॉपिंगला सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. तसेच ऑनलाईन शॉपिंगमुळे बऱ्याचवेळा काय घेऊ आणि काय नको, अशी अवस्था होते. सेलमधून स्वस्तात मिळतंय म्हणून बऱ्याचवेळा नको त्या गोष्टींची खरेदी केली जाते. म्हणून पावसाळी सेलमध्ये शॉपिंग करण्यापूर्वी खालील गोष्टींचा जरूर विचार करा.

'मॉन्सून ऑफर'मध्ये शॉपिंग करताना अशी काळजी घ्या!

सेलमध्ये खरेदी करण्यापूर्वी आवश्यक वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा. 
सेलमध्ये वस्तू दिसतेय म्हणून खरेदी करण्याचा मोह टाळा
वस्तुनिहाय खरेदीचं बजेट तयार करा आणि त्याला स्टिकअप राहण्याचा प्रयत्न करा.
एकावर एक फ्री ऑफर असणाऱ्या विशेषत: खाद्यपदार्थांची खरेदी करू नका. कारण त्याची एक्सपायरी डेट जवळ आलेली असते.
मॉन्सून ऑफर्स नेमकी काय आहे, त्याचे नियम समजून घेऊनच खरेदी करण्याचा निर्णय घ्या.
ऑफर्स असणाऱ्या शॉपिंगसाठी जाण्यापूर्वी मित्र-मैत्रिण किंवा घरातील एका सदस्याला सोबत घ्या. यामुळे चांगल्या वस्तुंची निवड करणं सोपं जाऊ शकतं.
फ्री मिळणाऱ्या वस्तूंसाठी नको त्या गोष्टींची खरेदी करू नका. 
सेलमध्ये विशेष करून कपड्यांची खरेदी करताना ट्रायल करूनच घ्या. कारण सेलमधील कपडे शक्यतो बदलून दिले जात नाहीत.
सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना त्यावरील माहिती, ऑफर आणि एक्सापायरी डेट आवश्य वाचा.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना त्याची ट्रायल घ्या आणि मगच खरेदी करा.
डिस्काऊंट सेल किंवा ऑफर या नेहमीच सुरू असतात. त्यामुळे शक्यतो मनावर ताबा ठेवूनच शॉपिंग करा.