लग्नानंतर काही काळ परदेशात असताना आरती जाधव यांनी मातीपासून गणपतीची मूर्ती घडविली आणि कमी साहित्यात सुंदर सजावट केली. अनेकांना ती सजावट आवडल्यामुळे वेगवेगळ्या सणांना लागणा-या सजावटीच्या विविध गोष्टी करुन विकण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. भारतात परतल्यानंतर व्यवसायाने फॅशन डिझायनर असणाऱ्या आरती यांनी लॅाकडाऊनच्या काळात काही महिलांना हाताशी घेऊन पन्नास हजारांच्या वर मास्क शिवून ‘फॅशुनिक ब्युटीक’ या ब्रॅन्डच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला.
लॅाकडाऊनच्या काळात 2019 साली आरती यांनी भारतीय परंपरेनुसार वर्षभर साजरे होणारे सण, सणाला लागणा-या पारंपरिक गोष्टी, घर सजावटीच्या विविध वस्तू बनवायला सुरूवात केली. स्वत:च्या व्यवसायाचे नाव काहीतरी युनिक असावे, या इच्छेतून शौर्य आणि सान्वी या दोन मुलांच्या नावांच्या पहिल्या अक्षरापासून आरती यांनी त्यांच्या ब्रॅन्डला ‘शौसा’ हे नाव दिले.
Table of contents [Show]
भारतीय संस्कृतीची शुभ चिन्हे
गुढीपाडव्यासाठी खणाच्या कापडाची रेडिमेड गुढी, आंब्याची पाने, फुलांचे दोन प्रकारचे हार असा Combo Pack आरती यांनी बाजारात आणला आहे. 500 ते 2000 रुपयांपर्यत हे एकत्रित उत्पादन उपलब्ध आहेत. स्वस्तिक, कलश, आंब्याची पाने अशी भारतीय संस्कृतीमधील शुभ चिन्हे काढलेले हाताने प्रिंट केलेले तोरण हे आरती यांचे विशेष उत्पादन आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तुंची सोय
लहान मुलांच्या आवडीच्या दृष्टीने आरती यांनी जेवणाचे ताट ठेवायला केळीचे पान, लहान/ मोठ्या आकारात उपलब्ध केले आहेत. चैत्रगौर साठी त्यांची ‘कलश साडी’ प्रसिध्द आहे. तोरणं, माळा, हार, फुलं, टोप्या, चौरंगावर/पाटावर टाकायचे कव्हर अशा कित्येक गोष्टी खणाच्या कापडापासून बनवल्या जातात. ‘शौसा’ मध्ये नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या देवीसाठी उपलब्ध आहेत. तसेच, देवीसाठी रेडिमेड साड्या जशा विकत मिळतात तशाच ग्राहकांना हव्या त्या उंचीच्या, रंगाच्या साड्या देखील करुन मिळतात.
वस्तू एक, उपयोग अनेक
आरती यांनी सगळ्या गोष्टी अनेकवेळा वापरता येतील अशाच पध्दतीने डिझाईन केल्या आहेत. केळीच्या पानाचा याचा उपयोग जेवणाचे ताट ठेवायला आणि एरव्ही टेबल मॅट किंवा होम डेकॅार साठी होतो. मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी पारंपरिक खणाचे कापड वापरून बनविल्या जातात. त्यांच्या व्यवसायात लागणारे खणाचे कापड पुण्यातील खणआळी आणि बंगलोरहून मागवले जाते.
परदेशातून शौसा क्रिएशनची मागणी
‘शौसा क्रिएशन’द्वारे तयार केलेल्या घर सजावटीच्या वस्तू, खास सणासाठी बनवलेल्या कलाकृती आत्तापर्यत संपूर्ण महाराष्ट्र, भारतात, तसंच परदेशात देखील गेल्या आहेत. परदेशात वास्तव्यास असलेली भारतीय मंडळी वर्षातून एकदा भारतात येतात, तेव्हा संपूर्ण वर्षाच्या सणांसाठी लागणा-या गोष्टी एकत्रपणे घेऊन जातात. ग्राहकांचे वैशिष्ट्य म्हणजे, तोच तो ग्राहक पुन्हा-पुन्हा आपली मागणी नोंदवून दरवर्षी काहीतरी नवनवीन वस्तू घेऊन जातो, असे आरती जाधव सांगतात.
गरजू महिलांना प्रशिक्षण
गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून आरती त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम देतात. आज शौसा क्रिएशन मध्ये अशा ६ महिला काम करतात.
सोशल मीडियाचा मोठा वाटा
पोस्ट आणि फोटो टाकले की लगेचच ग्राहकांकडून मागणी होते, ग्राहकांनी मागणी केली की पॅकिंग करुन लगेचच कुरीयर कंपनी किंवा भारतीय पोस्टाने वस्तू त्या ठिकाणी रवाना होते. पुण्यात काही दुकानात या सगळ्या वस्तू ग्राहकांना खरेदी करता येतात. काही छोट्या गावातून, नाशिक, मुंबईत काही ठिकाणी शौसा क्रियेशनच्या वस्तू मिळतात.सध्या शौसा क्रियेशन ऑनलाईन मार्केटिंग करुन मालाची विक्री करत असून भविष्यात विविध प्रदर्शने भरवण्याची इच्छा असल्याचे आरती यांनी सांगितले.
शौसा क्रियेशनचे काम वर्षभर सुरु
सतत नाविन्याच्या शोधात असणाऱ्या आरती दरवर्षी ग्राहकांना काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करतात. नवीन गोष्टी मिळत असल्याने ग्राहक सुध्दा आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे चैत्र महिन्यात गुढीपाडव्या पासून ते संक्रांतीपर्यत आरती यांच्या शौसा क्रियेशनचे काम वर्षभर चालू राहते.