आर्थिक वर्ष 2022-23च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ज्या कंपनीच्या नफ्यात (Profit) वाढ झाली आहे, त्या कंपनीचं नाव आहे भारत बिजली (Bharat Bijlee). या कंपनीचा नफा 16 कोटींवरून 25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीचं उत्पन्नदेखील वाढलं आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. सीएनबीसीनं हे वृत्त दिलं आहे.
वाढलं कंपनीचं उत्पन्न
आर्थिक वर्ष 2022-23च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत, कंपनीचं उत्पन्न 277 कोटी रुपयांवरून 2023-24च्या एप्रिल-जून तिमाहीत 441 कोटी रुपये झालं आहे. एबिट्डा (EBITDA) म्हणजेच कामकाजाच्या नफ्यात 22 कोटी रुपयांवरून 32.6 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं दिसत आहे. EBITDA मार्जिन 7.94 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांवर आलं आहे. व्हीएनबी (VNB) मार्जिन 31 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर आलं आहे. एपीई 3.8 टक्के कमी होऊन 1,461 कोटींवर आला आहे.
भारत बिजलीच्या काही प्रमुख बाबी
जानेवारी-मार्च तिमाहीत प्रवर्तकांची हिस्सेदारी 33.86 टक्के होती. मात्र, एप्रिल-जूनचा हिस्सा अद्याप जाहीर झालेला नाही. एफआयआय (FII) म्हणजेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कंपनीतली त्यांची भागीदारी सातत्यानं वाढवत असताना दिसत आहेत. मार्च 2022मध्ये हा हिस्सा 0.6 टक्के होता, तोच मार्च 2023मध्ये वाढून 0.88 टक्के झाला आहे. मात्र, एप्रिल-जून तिमाहीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
भारत बिजलीविषयी...
भारत बिजली ही एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर यासंबंधीची सविस्तर माहिती आहे. या माहितीनुसार, भारत बिजली हे उद्योगातल्या सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक आहे. 1946मध्ये ही कंपनी सुरू झाली. पॉवर सिस्टम्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि प्रकल्प विभागांमध्ये कंपनी कार्यरत आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक मोटर्स, ड्राइव्हस् आणि इंडस्ट्री ऑटोमेशन आणि लिफ्ट सिस्टम विभागासाठीही कंपनी काम करते. कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे.