Share Market Crash : शेअर मार्केटसाठी आजचा (दि. 13 जून) सोमवार ब्लडी मंडे (Bloodbath Monday) ठरला. सेन्सेक्समध्ये 1456 अंक आणि निफ्टीमध्ये 427 अंकांची घसरण झाली. यामुळे आजच्या एका दिवशी गुंतवणूकदारांच्या एकूण 7 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आणि आठवड्याची सुरुवात ही खराब झाली.
अमेरिकेमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. गेल्या 40 वर्षांच्या कालावधीत महागाई सर्वोच्च स्थानावर पोहोचली आहे. या वाढत्या महागाईमुळे अमेरिकन रिझर्व्ह फेडरलवर व्याज दर वाढीचा दबाव वाढला आहे. त्यात फेडरल पूर्वीच्या 50 बेसिस पॉईंटऐवजी 75 बेसिस पॉईंटने व्याज दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.
फेडरल रिझर्व्हची 14 आणि 15 जून रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढत जोरदार विक्री केली. यामुळे अमेरिकेतही बाजार कोसळल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेतील बाजाराच्या बातम्यांमुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीची सपाटा लावला, परिणामी सेन्सेक्स 1546 अंकांनी खाली आला.
रूपयाचीही नीचांकी घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण अद्याप सुरू आहे. आज रुपयामध्ये 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे एका डॉलरसाठी 78.02 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दरवाढीच्या बातम्यांमुळे रुपयामध्ये घसरण झाली.