शेअर बाजारात ट्रेडिंग करताना नुकसान होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण प्रवाहाविरुद्ध जाऊन कृती करतो. परिणामी, नुकसान होणे अटळ असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, अर्थसंकल्पाचे घेऊ !
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरण होते अशी एक धारणा सर्वांमध्ये दिसून येते. त्यामुळे अनेक जण बजेट नंतरच्या काळात बाजाराचे सर्व निर्देशांक वधारत असतानाही पूट बाय करतात. कारण त्यांना बाजारात घसरण होईल असे वाटत असते. प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत म्हणून किंवा भविष्यातील आशादायक चित्रामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार चांगल्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत असतात. साहजिकच यामुळे निफ्टीमध्ये घसरण होण्याऐवजी वाढ होत जाते. गतवर्षी अर्थसंकल्पानंतर बाजारात तेजीची मोठी रॅली दिसून आली होती.
यंदाच्या वर्षीही तितक्या जोरदारपणे नसेल; पण बाजारात गेल्या दोन दिवसांत तेजीचा माहोल दिसून येत आहे. विशेषतः पायाभूत सुविधांवर सरकारकडून करण्यात येणार असणारा खर्च, एकूण भांडवली खर्च, वित्तीय तूट, बँकांच्या एनपीएच्या संकटावरील उतारा या सर्व गोष्टींमुळे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ होत आहे. अशा वेळी जर आपण पूट बाय करुन ठेवला तर साहजिकच त्याची किंमत कमी होत जाऊन आपले नुकसान होईल.
याउलट स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात नकारात्मक वातावरण तयार झालेले असताना, इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली असताना, युद्धसदृश परिस्थिती असताना किंवा लॉकडाऊनसारख्या संकटाच्या काळात जर आपण किरकोळ गोष्टी पाहून बाजारात तेजी दिसेल असे अनुमान काढून कॉल बाय केले तर साहजिकच पदरी नुकसान आल्यावाचून राहणार नाही.
त्यामुळे बाजाराचा कल पाहून मगच ट्रेडिंग करण्यात शहाणपण आहे. हा कल ओळखणे ही अभ्यासपूर्ण प्रक्रिया आहे. पण काही सोप्या गोष्टी यासाठी पाहता येतील. एक म्हणजे एसजीएक्स निफ्टी (SGX Nifty) पहा. दुसरे म्हणजे डाऊ फ्युचर्स आणि नॅसडॅक फ्युचर्स पहा. तिसरे म्हणजे रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांसारख्या दिग्गज शेअर्सच्या भावांची स्थिती पाहा. चौथी गोष्ट म्हणजे आयटी (IT) क्षेत्राचा चार्ट पहा. या सर्वांमध्ये जर चढता आलेख दिसत असेल तर त्या दिवशी बाजारात तेजी हमखास दिसून येईल. याउलट यातील 2 हून अधिक क्षेत्रांत घसरण सुरू झाली असेल तर बाजार खाली येण्यास सुरुवात झाली आहे, असे मानावे. हे अगदी प्राथमिक निकष आहेत. पण नवोदितांसाठी ऑप्शन चेन (Option Chain)च्या जोडीला या निकषांचा अभ्यास केल्यास नुकसान टाळता येणे किंवा कमी करता येणे शक्य होऊ शकते.