जगभरातील सेंट्रल बँकांनी महागाईबाबत व्यक्त केलेली चिंता आणि व्याजदरवाढीचा सपाटा, चीनमधील कोरोनाची वाढती आकडेवारी या घटनांनी धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात चौफेर विक्री केली. आज मंगळवारी 20 डिसेंबर रोजी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे. आजच्या सत्रात बँका, रियल्टी, आयटी, मेटल, इन्फ्रा या क्षेत्रात मोठी पडझड झाली. आज गुंतवणूकदारांचा किमान दोन लाख कोटींचे नुकसान झाले.
आशियातील प्रमुख शेअर निर्देशांकात घसरण झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. चीनमधील काही शहरांमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचे संकट गडद झाले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वधारला होता.
सध्या सेन्सेक्स 613 अंकांच्या घसरणीसह 61193 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी 189 अंकांनी कोसळला असून तो 18230 अंकांवर आहे. सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व 30 शेअरमध्ये आज घसरण झाली. ज्यात एसबीआय, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, टीसीएस, रिलायन्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एचयूएल, मारुती, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एनटीपीसी या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे.
निफ्टी मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आज घसरण झाली. निफ्टी बँक 0.40%, निफ्टी ऑटो 0.70%, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस 0.46%, निफ्टी एफएमसीजी 0.62%, निफ्टी रियल्टी 0.55%, निफ्टी फार्मा 0.45% आणि निफ्टी मेटल 0.47% घसरण झाली आहे. दुसऱ्या बाजूला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन 5.26%, फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स 4.65%, डीएसजे किप लर्निंग 3.66%, शिपिंग कॉर्पोरेशन 3.56% आणि दि न्यू इंडिया इन्शुरन्स 2.91% हे शेअर तेजीत आहेत.
'एलआयसी'ने IRCTC चे शेअर खरेदी केले
आज एलआयसीने शेअर बाजारात IRCTC चे 2.27% शेअर खरेदी केले. यानंतर एलआयसीचा IRCTC मधील हिस्सा 7.278% इतका वाढला आहे. आजच्या ब्लॉक डिलमुळे एलआयसीचा शेअर 0.93% वाढला होता. एलआयसी सध्या 741.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. IRCTC चा शेअर मात्र 0.95% ने घसरला असून तो 670.35 रुपयांवर आहे.
शेअर बाजारात सोमवारी धडकली होती तेजीची लाट
शेअर बाजारात काल सोमवारी तेजीची लाट धडकली होती. कालच्या सत्रात सेन्सेक्स 468 अंकांनी वधारला होता. निफ्टीने 18400 अंकांची पातळी ओलांडली होती. कालच्या सत्रात रुपयामध्ये 13 पैशांची वाढ झाली होती. आज मात्र सकाळपासून बाजारात विक्रीचा मारा सुरु आहे.