डिसेंबर 2022 या महिन्यातील वस्तू आणि सेवा करातून मिळालेला दमदार महसूल, वाहन कंपन्यांनी जबरदस्त विक्री या पार्श्वभूमीवर आज सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 70 अंकांनी वधारला.
गुंतवणूकदारांनी वर्ष 2023 च्या पहिल्याच दिवशी चांगले स्टॉक्स खरेदी करुन पोर्टफोलिओ बॅलन्सिंगला प्राधान्य दिल्याचे शेअर दलालांनी सांगितले. लवकरच कॉर्पोरेट कंपन्यांकडून तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आजच्या सत्रात मेटल, इन्फ्रा, टेलिकॉम, रियल्टी, ऑटो, टेक, बँकिंग या क्षेत्रातील शेअर्सला मागणी आहे.
दुपारी 12 वाजता बीएसई सेन्सेक्स 231 अंकांच्या वाढीसह 61072 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 80.7 अंकांच्या तेजीसह 18186 अंकांवर ट्रेड करत आहे. बीएसईवरील 30 पैकी 16 शेअर तेजीत असून 14 शेअरमध्ये घसरण झाली आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, नेस्ले, एनटीपीसी, टायटन, इंड्सइंड बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस या शेअरमध्ये 0.5% ते 2% वाढ झाली. त्याशिवाय ग्रासिम इंडस्ट्रीड, हॅवेल्स, अदानी ट्रान्समिशन, अव्हेन्यू सुपरमार्ट्स, अशोक लेलॅंड, टाटा कम्युनिकेशन या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
दुसऱ्या बाजूला माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रावरील दबाव कायम आहे. आजच्या सत्रात विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा या सेन्सेक्समधील बड्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्याचबरोबर पॉवरग्रीड, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, मारुती, महिंद्रा अॅंड महिंद्रा, सन फार्मा, एशियन पेंट्स, एचयूएल हे शेअर देखील शुक्रवारच्या तुलनेत घसरणीसह ट्रेड करत आहेत.
सरत्या वर्षातील अखेरच्या महिन्यात जीएसटीमधून सरकारला 1.49 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. यावरुन अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. मात्र शेअर बाजाराचे मूल्यांकन खूप जास्त असल्याचे वर्षाच्या सुरुवातीला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा ट्रेंड पाहायला मिळेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
शेअर बाजारात तेजी येण्यामागे आणखी कारण म्हणजे डिसेंबरमध्ये पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. एसअॅंडपीने तयार केलेला पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स डिसेंबर 2022 मध्ये 57.8 वर गेला. त्याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये तो 55.7 होता. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 293 अंकांनी आणि निफ्टी 86 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला होता.