शेअर मार्केटमध्ये सलग चौथ्या सत्रात प्रचंड घसरण झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर गुंतवणूकादारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चौफेर विक्रीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला असून तो 60200 अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टीमध्ये 200 अंकांची घसरण झाली आहे. आजच्या पडझडीने गुंतवणूकदारांना जवळपास दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
बँकां, वित्त संस्था, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी या क्षेत्रात चौफेर विक्रीचा सपाटा सुरु आहे. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 26 शेअर घसरले आहेत. यात रिलायन्स, पॉवरग्रीड, एचयूएल, आयटीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, मारुती, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, विप्रो, टाटा स्टील, एलअॅंडटी, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये घसरण झाली. 30 पैकी 4 शेअरमध्ये मात्र तेजी आहे. यात एचसीएल टेक, सन फार्मा, नेस्ले आणि एनटीपीसी या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहे. याचे पडसाद आज आशियातीस प्रमुख शेअर बाजारांवर उमटले. त्याचबरोबर चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे टोकियो, सिंगापूर, शांघाई या शेअर बाजारात घसरण झाली. त्याचाही परिणाम भारतीय बाजारांवर दिसून आल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.
आजच्या सत्रात रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी पडझड दिसून आली. ओमेक्स, शोभा लिमिटेड, फिनिस्क मिल, गोदरेज प्रॉपर्टीज, सनटेक रियल्टी, डीएलएफ, प्रेस्टिज इस्टेट, ओबेराय रियल्टी, नेस्को, इंडियाबुल्स रिअल इस्टेट या शेअरमध्ये 1% ते 4% घसरण झाली. सध्या सेन्सेक्स 704 अंकांच्या घसरणीसह 60100 अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 208 अंकांच्या घसरणीसह 17918 अंकावर आहे.
पीएयसू बँकांचे शेअर गडगडले
आजच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये घसरण झाली. सलग तिसऱ्या सत्रात पीएसयू बँकांच्या शेअरला नफावसुलीचा फटका बसला. युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, पीएनबी बँक या बँकांचे शेअर 3% ते 5% या दरम्यान कोसळले.