वर्ष 2022 च्या अखेरच्या टप्प्यात गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओ संतुलित करण्याला प्राधान्य दिले आहे. आज शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांनी ब्लुचिप शेअर्सची खरेदी केली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 200 अंकांची झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये 60 अंकांची वाढ झाली.
मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर 30 पैकी 18 शेअर तेजीत आहेत. आयटी, बँका, एफएमसीजी क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायानान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एसबीआय, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, टीसीएस या ब्लुचिप शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजुला एनटीपीसी, नेस्ले, एचडीएफसी, मारुती, आयसीआयसीआय बँक, इंड्सइंड बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक या शेअरच्या किंमतीत घसरण झाली.
सध्या सेन्सेक्स 111 अंकांनी वधारला असून तो 61237 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह 18213 अंकांवर व्यवहार करत आहे.
निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स 2% ने वाढला. निफ्टी ऑटो, निफ्टी मेटल, निफ्टी आयटी या निर्देशांकात 1% हून अधिक वाढ झाली. निफ्टीवर बजाज फिनर्व्ह, ओएनजीसी, टायटन , बजाज ऑटो हे शेअर वधारले. एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, भारती एअरटेल या शेअरमध्ये घसरण झाली.
शेअर बाजाराच्या दृष्टीने वर्ष 2022 सकारात्मक राहिले. जगभरातील इतर शेअर निर्देशांकात 10 ते 20% घसरण झाली तर निफ्टी 4.8% वाढला होता. आता गुंतवणूकदार इयर एंडच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे बाजाराता फारशी मोठी उलथापालथ होणार नाही, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केले. 12 जानेवारीपासून तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील, तेव्हा शेअर मार्केटमध्ये हालचाल दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. काल गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 223 अंकांनी तर निफ्टी 68 अंकांनी वधारला होता.