मागील चार सत्रात स्वस्त झालेल्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने आज शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट धडकली. आज सोमवारी 26 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 190 अंकांनी वधारला असून निफ्टीने 18000 अंकांची पातळी ओलांडली.
सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्सवर दबाव दिसून आला. त्यात 100 अंकांची घसरण झाली होती. मात्र त्यानंतर निर्देशांकाने तेजीची वाट धरली. बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑईल , मेटल या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. एचडीएफसी, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक बँक, सन फार्मा हे शेअर पहिल्या तासात वधारले होते. निफ्टी मंचावर एफएमसीजी इंडेक्स वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी आयटी, निफ्टी पीएसयू बँक हे इंडेक्स तेजीत आहेत.
इन्फिबीम, एसजीव्हीएन, युनियन बँक ऑफ इंडिया, धानी सर्व्हिसेस या शेअरमध्ये वाढ झाली. अदानी पॉवर, फ्युचर रिटेल, टिमकेन इंडिया, स्पंदना स्फुर्ती फायनान्शिअल, अजंता फार्मा या शेअरमध्ये घसरण झाली आहे. झोमॅटोचा शेअर आज टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये 11% वाढ झाली होती. तो 59.75 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
रियल्टी सेक्टरमधील शेअर्सला आज मागणी दिसून आली. सनटेक रियल्टी, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, शोभा लिमिटेड, डीएलएफ, ओमॅक्स या शेअरमध्ये 3 ते 4 % वाढ झाली. सरकारी कंपनी कोल इंडियाचा शेअर 2.16% ने वधारला. कोल इंडिया 219.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
आज इंट्रा डेमध्ये सेन्सेक्सने 600 अंकांची झेप घेतली होती. दुपारी 1 वाजता सेन्सेक्स 602 अंकांच्या वाढीसह 60447 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 178 अंकांनी वाढला असून तो 17985 अंकांवर ट्रेड करत आहे.मागील चार सत्रात सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले होते. परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील प्रचंड विक्री झाली होती. आज मात्र चांगल्या शेअर्सला गुंतवणूकदारांनी पसंती दिली. टेलिकॉम, बँक, कॅपिटल गुड्स, फार्मामधील काही निवडक स्टॉक आज तेजीत होते. ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.