Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

भांडवली बाजार नियामक अर्थात सेबी (Securities and Exchange Board of India) एंजल ब्रोकिंग लिमिटेडविरोधात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. भांडवली बाजारात सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नुकतीच सेबीनं एंजल ब्रोकिंगवर कारवाई केलीय. दंडाची रक्कम 10 लाख रुपये इतकी आहे. एंजल ब्रोकिंग (Angel One Ltd) ही एक नोंदणीकृत संस्था आहे. स्टॉक आणि कमोडिटी ब्रोकर म्हणून याची ओळख आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (National Stock Exchange) लिस्टेड अशी ही कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवहारासंदर्भात सेबीसह स्टॉक एक्स्चेंज आणि ठेवीदार या सर्वांनीच संयुक्तपणे एंजल ब्रोकिंगच्या विरोधात तपासणी केली. त्यात गैरप्रकार आढळल्यानंतर सेबीमार्फत ही दंडाची कारवाई करण्यात आलीय. मिंटनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

आढळून आली अनियमितता

मागील काही काळापासून कंपनीसंदर्भात काही अनियमितता आढळून येत होती. साधारणपणे एप्रिल 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत भारतीय सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्डामार्फत कंपनीच्या एकूण कामाकाजासंदर्भात तपासणी करण्यात आली. तपासाअंती कंपनीत गैरप्रकार आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

सेबीचा 78 पानांचा आदेश

संबंधित कंपनीनं ग्राहकांच्या जवळपास 32.97 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचं सेबीला आढळलं आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडनं ज्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये क्रेडिट शिल्लक आहे, त्यांच्या सिक्युरिटीज तारण ठेवल्या आणि हा गैरव्यवहार केला, असं सेबीला आढळून आलं. एवढंच नाही, तर 43.96 लाख रुपये नॉन सेटल करण्यात आले. जवळपास 300 केसेसमध्ये तपासणीच्या कालावधीत निष्क्रिय ग्राहकांच्या निधीची पूर्तताच कंपनीनं केली नाही. या सर्वा बाबींच्या संदर्भात सेबीनं 78 पानांचा आदेश जारी केलाय.

नियमांचं उल्लंघन

मागच्या तीन महिन्यांमध्ये काही ग्राहकांनी कोणताही ट्रेड केलेला नही. अशा ट्रेड न केलेल्या ग्राहकांसंदर्भातली वास्तविक पूर्ततादेखील एंजल ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीनं केलेली नाही. ही रक्कम 16.65 लाख रुपये इतकी होती. जानेवारी 2020नंतर फंड आणि सिक्युरिटीजचं मूल्य 85पट राखून ठेवलं. सेटलमेंटच्या तारखेला अंमलात आणलेल्या उलाढालीच्या मूल्याच्या मर्यादेपर्यंत हे मूल्य राखून ठेवण्यात आलं. कॅश मार्केट सेगमेंटमध्ये या सर्व बाबी करण्यात आल्या. 85पट राखून ठेवलं आणि सेटल न केलेली रक्कम 10.26 लाख रुपये मानण्यात आली. हा सर्व प्रकार नियमाचं उल्लंघन करणारा आहे.

नियतकालिक समेट नाही

एंजल ब्रोकिंग कंपनीनं आपल्या ठेवीदार सहभागींच्या खात्यांमध्ये नियतकालिक समेटच केला नाही. एकूण रकमेचा फरक होता 44.72 लाख रुपये. याचं संपूर्ण मूल्य 1226.73 कोटी रुपये होतं. त्याचबरोबर कंपनीनं नॉन रिकव्हरी डेबिट बॅलन्ससाठी क्लायंटला T+2+5 दिवसांसाठी एक्सपोजर दिलं होतं. त्याची रक्कम होती 2.10 कोटी रुपये.

फंड बॅलेन्समध्ये तफावत

कंपनीचा गैरप्रकार इथंच थांबत नाही. कंपनीनं 30602 क्लायंट्सच्या चुकीच्या लेजर बॅलन्स रिपोर्ट दिला. ऑक्टोबर 2020च्या एक्स्चेंजला 340.81 कोटी रुपयांचा निव्वळ फरक नोंदवला, असं सेबीला आढळून आलं. सेबीनं पुढं सांगितलं, की कंपनीच्या लेजर आणि डेली मार्जिन स्टेटमेंटनुसार, कंपनीच्या फंड बॅलेन्समध्ये तफावत दिसून येत होती. या सर्वांचा परिणाम म्हणून सेबीनं सध्या एंजल ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीला दंड ठोठावलाय.