भारताच्या बाजार नियामक मंडळाने (सिक्युरिटीज अण्ण एक्सचेंज ऑफ इंडिया-सेबी) मंगळवारी गहू, तांदूळ (धान), चने, मोहरी, सोयाबीन, मूग आणि कच्चे पाम तेल या सात वस्तुंच्या ट्रेडिंगवरील बंदी आणखी एक वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजे शेतीशी संबंधित असलेल्या या 7 प्रकारच्या वस्तुंवर 20 डिसेंबर 2023 पर्यंत ट्रेडिंग करता येणार नाही.
सेबीने गेल्या 20 वर्षात तब्बल 19 वेळा डेरिव्हेटीव्ह मार्केटमधील काही वस्तुंवर बंदी घातली होती. काही वस्तुंवरील बंदी अद्याप उठवण्यात आलेली नाही. 20 डिसेंबर 2021 मध्ये सेबीने 7 अॅग्री प्रोडक्ट्सवर बंदी घातली होती. ती अजून एक वर्षाने वाढवली आहे. अन्नधान्यांच्या किमतीत हळूहळू वाढ होत असताना यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रथमच किरकोळ महागाईचा दर आरबीआयने घालून दिलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आला आहे.
सेबीने गेल्यावर्षी वनस्पती तेल, गहू आणि तांदूळ या प्रमुख अन्नधान्यांच्या गोष्टींवरील चलनवाढीला आळा घालण्यासाठी यावरील ट्रेडिंगवर वर्षभरासाठी बंदी घातली होती. सेबीने पुन्हा एकदा या घटकांवरील बंदी वाढवली आहे. यात प्रामुख्याने कच्चे पाम तेल, गहू, तांदूळ, चने, मोहरी, सोयाबीन आणि मूग यावरील बंदी अजून एक वर्षासाठी वाढवली आहे.
कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय? What is Commodity Trading?
कमोडिटी मार्केट किंवा कमोडिटी ट्रेडिंग हे शेअर मार्केटपेक्षा थोडे वेगळे आहे. याला साध्यासोप्या भाषेत वस्तूबाजार म्हटले जाते. भारतात सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिवेटीव एक्सचेंज (NCDEX) या दोन एक्सचेंजमधून मोठ्या प्रमाणात कमोडिटी व्यवहार केले जातात. याशिवाय नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज (NMCX), इंडियन कमोडिटी एक्सचेंज (ICEX), युनिव्हर्सल कमोडिटी एक्सचेंज (UCE) आणि ए सी ई डेरिवेटीव एक्सचेंज (ACEDE) येथूनही व्यवहार करता येतात. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांनाही कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली.
कमोडिटी मार्केटमध्ये फक्त शेतमालाचीच खरेदी विक्री होते असे नाही. तर कमोडिटी मार्केटमध्ये मौल्यवान धातू (सोने, चांदी), शेतमाल, धातू (तांबे, अल्युमिनिअम, शिसे) आणि ऊर्जा या चार प्रकारांमध्ये कमोटिडी ट्रेडिंग चालते.