IPO Listing Rules: भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने IPO लिस्टिंग नियमांत बदल केला आहे. पूर्वी IPO लिस्ट होण्यास T+6 इतका कालावधी लागत होता. तो आता T+3 इतका केला आहे. म्हणजेच IPO इश्यू बंद झाल्यानंतर 3 दिवसानंतर लगेच लिस्ट होईल.
कधीपासून नवा नियम लागू होणार?
1 सप्टेंबर 2023 पासून 3 दिवसानंतर लगेच IPO लिस्ट करण्याचा नियम कंपन्यांसाठी ऐच्छिक असेल. मात्र, 1 डिसेंबर 2023 पासून हा निर्णय सर्व IPO साठी अनिवार्य असेल. T+3 मध्ये T म्हणजे इश्यू बंद होण्याचा दिवस होय.
गुंतवणुकदारांचा फायदा होणार?
आता शेअर्स डिमॅट खात्यात जमा होण्यासाठी 6 दिवस वाट पाहण्याची गरज नाही. 3 दिवसानंतर लगेच शेअर्स गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा होतील. तसेच ज्या अर्जदारांना IPO मिळाला नाही त्यांच्या खात्यात लवकर पैसे माघारी येतील. भांडवली बाजारातील विविध घटकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याने सेबीने म्हटले आहे.
IPO चे सर्व व्यवहार जलद होणार
या निर्णयाचा फायदा बँका, डिपॉझिटर्स, स्टॉक एक्सचेंज, ब्रोकर्स या सर्वांना होईल, असे सेबीने म्हटले आहे. IPO चे व्यवहार जलद होतील. नव्या नियमानुसार T+1 म्हणजेच इश्यू बंद झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कंपन्यांना अॅलोटमेंट निश्चित करावी लागेल. ज्या अर्जदारांना IPO मिळाला नाही त्यांना T+2 दिवशी पैसे माघारी मिळतील.
अर्थव्यवस्था तेजीत आल्यामुळे IPO चे प्रमाणही वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात 10 पेक्षा जास्त IPO येणार आहेत. तसेच पुढील काही महिन्यात अनेक कंपन्या भांडवली बाजारातून पैसे उभारण्याच्या तयारीत आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळाव्यात, कंपनीचा कसा अभ्यास करावा याची माहिती तुम्हाला या लिंकवर मिळेल.