देशातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरूण/तरूणींना प्रशिक्षित करून किमान किंवा त्याहून अधिक वेतनाची नोकरी उपलब्ध व्हावी, हा दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा (DDU-GKY) मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील जीवनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ही योजना सुरू केली. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना कुशल बनण्यास मदत होणार असून त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची मागणी-आधारित प्लेसमेंट कौशल्य प्रशिक्षणाची योजना आहे. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचा एक भाग आहे.
या योजने अंतर्गत खाजगी शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने 15 ते 35 वयोगटातील तरूणांना रोजगाराधित कौशल्याबरोबरच संगणक / टॅबलेटचा वापर, इंग्रजी बोलणे आणि इतर जीवन कौशल्यांचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला आणि दिव्यांगांसाठी 35 वर्षांचे वयाचे बंधन नसणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगल्या संस्थांमध्ये नोकरी मिळण्यासाठी मदत केली जाणार आहे.
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेची वैशिष्ट्ये
गरीब आणि उपेक्षितांना फायदेशीर व महत्त्वाच्या योजनांपर्यंत पोहोचण्यास सक्षम करणे
ग्रामीण भागातील गरिबांना त्यांच्या मागणीनुसार मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे
सामाजिकदृष्ट्या वंचित गटांतील लोकांचा सहभाग वाढवणे
नवनवीन तंत्रज्ञानात युवकांना अपग्रेड करण्यासाठी प्रशिक्षणावर भर
परदेशात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन त्यानुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे
माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार करणे
भागीदारीत रोजगार निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे
योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या किमान 75% प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराची हमी देणे
प्रकल्प सहायता निधी
रोजगाराशी निगडीत कौशल्य प्रकल्पांसाठी DDU-GKY द्वारे निधी उपलब्ध करून दिला जातो. प्रकल्पाच्या कालावधीनुसार आणि मार्केटमधील स्थितीनुसार 25,696 रूपयांपासून ते 1 लाख रूपयांपर्यंतचा निधी देण्याची तरतदू आहे. तसेच DDU-GKY च्या माध्यमातून 3 ते 12 महिनांच्या प्रशिक्षण प्रकल्पांना निधी दिला जातो. यामध्ये प्रशिक्षण खर्च, राहण्याचा आणि भोजन खर्च, वाहतूक खर्च आणि रोजगाराशी निगडित खर्चांचा समावेश आहे.
कौशल्यावर आधारित प्रशिक्षणावर भर
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने द्वारे अतिथी सेवा (हॉस्पिटॅलिटी), आरोग्य, बांधकाम, ऑटोमेशन, लेदर, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, हिरे-दागिने आदी 250 हून क्षेत्रातील लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या क्षेत्रातील मागणीनुसार कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे आणि किमान 75 टक्के शिकाऊ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे.
ग्रामीण कौशल्य योजनेमध्ये नोंदणी कशा पद्धतीने करावी?
- ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) नोंदणीसाठी http://ddugky.gov.in/apply-now या लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यावर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये नाव, पत्ता ,जिल्हा, राज्य, ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरा.
- ओळखीचा आणि भारतीय नागरिकत्वाचा पुरावा अपलोड करावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या व्यवसायाशी संबंधित माहिती भरून शेवटी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.