पूर्वीपासून एफडीलाच गुंतवणुकदारांची जास्त पसंती आहे. कारण, या ठिकाणी गुंतवणूक केल्यास रिस्क कमी असते. तसेच, ठरलेले व्याजदर तुमच्या एफडीची मुदत संपल्यानंतर मिळते. त्यामुळे लोकांची सर्वाधिक पसंती एफडीलाच असते. या सर्व गोष्टी हेरून SBI ने ग्राहकांसाठी अमृत कलश योजनेची सुरूवात केली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना 400 दिवसांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच, या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळत आहे. 15 फेब्रुवारीला योजनेची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत अनेकदा या योजनेची एफडी करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.
मुदतवाढ डिसेंबरपर्यंत
400 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर SBI सामान्य नागरिकांसाठी 7.10 टक्के व्याज देत आहे. तर जेष्ठ नागरिकांसाठी ते 7.6 टक्के आहे. त्यामुळे अल्पावधीतच नागरिकांना चांगले व्याजदर मिळत असल्याने, एफडीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे. त्यामुळे बँकेने पुन्हा एकदा एफडी करायची मुदत वाढवली आहे. याआधी हीच मुदत 15 ऑगस्टला संपणार होती. मात्र, बँकेने ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहक या स्पेशल योजनेद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत एफडी करू शकणार आहेत.
एफडीवर मिळणार लोन
ग्राहकांनी या योजनेत पैसे गुंतवल्यास त्यांना बराच लाभ होणार आहे. कारण, तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला लोनही मिळणार आहे. तसेच, या योजनेद्वारे ग्राहकांना व्याजाचे पैसे मुदत संपल्यानंतर मिळणार आहेत. जर तुम्हाला मुदतीच्या आत पैसे काढयचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला 0.50 टक्के ते 1 टक्क्यांपर्यंत चार्ज द्यावा लागू शकतो. त्यामुळे पैसे मुदत संपल्यावर काढणेच ग्राहकांसाठी चांगले राहणार आहे.
SBI चे नवे व्याजदर
SBI च्या FD मध्ये 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 3 टक्के ते 7.10 टक्के व्याज सामान्य नागरिकांना मिळणार आहे. तर याच डिपाॅझिटवर जेष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेसीस पाॅईंट्स (bps) व्याज मिळणार आहे. तुम्ही जर 7 दिवस ते 45 दिवसांसाठी FD करायचा विचार करत असल्यास, यावर तुम्हाला 3 टक्के व्याज मिळणार आहे. तेच, 46 दिवस ते 179 दिवसांसाठी 4.5 टक्के व्याज असणार आहे.
जर तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी एफडी करत असल्यास, तुम्हाला त्यावर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच, 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या मुदतीच्या एफडीवर तुम्हाला 6.5 टक्के व्याज मिळणार आहे. स्पेशल योजना म्हणजेच अमृत कलश योजनेद्वारे तुम्ही एफडी करत असल्यास तुम्हाला 7.10 टक्के व्याज मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 400 दिवसाच्या मुदतीसाठी एफडी करावी लागणार आहे.
तुम्हाला एफडी करायची असल्यास, तुम्ही बॅंकेच्या शाखेत जाऊन ती करू शकता. तसेच, तुमचे इंटरनेट बॅंकिंग असेल तर तुम्ही घरबसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुमच्याजवळ बॅंकेचे YONO अॅप असल्यास तुम्ही त्यावरूनही या योजनेत एफडी उघडू शकता. त्यामुळे तुम्हाला एफडी करण्यासाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही आहे.