Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Savings Account: ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्टेट बँकेच्या बचत खात्यातून पैसे कट; बँकेनं दिलं स्पष्टीकरण

SBI Online

Image Source : www.indiatvnews.com

स्टेट बँकेच्या बचत खात्यातून परवानगीशिवाय पैसे कापून घेतले जात असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. विमा पॉलिसी किंवा गुंतवणूक प्रॉडक्ट विकत घेतले नाही तर त्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून पैसे कट करण्यात आले. यावर बँकेनेही स्पष्टीकरण दिले आहे.

SBI Savings Account: मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक गोंधळून गेले आहेत. बचत खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय पैसे कापून घेतले जात असल्याची तक्रार अनेकांनी सोशल मीडियावर केलीय. जीवन विमा, म्युच्युअल फंडसारख्या योजनांच्या प्रिमियमसाठी हे पैसे कट होत आहेत. मात्र, ग्राहकांनी या पॉलिसी खरेदी केलेल्याच नाहीत. यावर आता बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. 

SBI ग्राहकांनी X (पूर्वीचे ट्विटर) माध्यमावर बँकेला टॅग करून तक्रारी दाखल केल्या आहेत. (SBI Savings Account customers) या सर्व तक्रारींमध्ये विना परवानगी खात्यातून पैसे कट केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, बँकेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

कोणतीही विमा पॉलिसी किंवा गुंतवणूक योजना ग्राहकांसाठी अनिवार्य नाही. जर अशा योजनांच्या प्रिमियमसाठी पैसे कापून घेतले गेले असतील तर ग्राहक बँकेकडे तक्रार करू शकतात. काल (शुक्रवार) एका बचत खातेधारकाच्या अकाउंटवरून 23,451 रुपये कापून घेतल्याचे फायनान्शिअल एक्सप्रेसने म्हटले आहे. इतर अनेक ग्राहकांसोबतही असाच प्रकार घडला.  

ग्राहकांच्या परवानगीशिवाय पैसे कापून घेतले नाहीत

खातेदाराच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे कापून घेतले नाहीत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. एसबीआय ग्राहकांना सेवा देताना सर्व नियमांचे पालन करते. एसबीआयच्या कोणत्याही विमा किंवा गुंतवणूक योजना ग्राहकांना अनिवार्य नाहीत, असे बँकेने अधिकृतरित्या म्हटले आहे. 

तुमच्या खात्यातून पैसे कापून घेतल्यास कुठे तक्रार कराल?

तुम्ही विकत न घेतलेल्या कोणत्याही पॉलिसीसाठी पैसे कापून घेतले असतील तर तुम्ही <https://crcf.sbi.co.in/ccf as Personal Segment/Individual> या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करू शकता. जनरल बँकिंग - ऑपरेशन ऑफ अकाउंट - डिस्प्युट डेबिट/क्रेडिट ट्रान्झॅक्शन वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यावर चुकीने व्यवहार झाला असेल तर पैसे माघारी मिळतील. 

बँक खात्याची सुरक्षितता कशी बाळगाल? 

बँकिंग क्षेत्रात विमा आणि इतर गुंतवणूक पॉलिसी विकण्यासाठी चढाओढ लागली आहे. (SBI complaint redressal) ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने अनेकवेळा पॉलिसी विकण्यात येतात. असे प्रकार अनेक बँकांत आढळून येत आहेत. यावर नियामक संस्थांनीही बँकांना निर्देश दिले आहेत. 

जर बँकेने ऑनलाइन तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला एखादी पॉलिसीच्या प्रिमियमसाठी पैसे कापून घेतले तर तुम्ही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता. तसेच खात्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले तर लक्षात येईल. अन्यथा अनेक दिवस तुम्ही जी पॉलिसी खरेदी केली नाही त्यासाठी तुमच्या खात्यातून पैसे कट होत राहतील.