दिवसभर काम करून, पोटाला वेळप्रसंगी चिमटा काढून दोन पैशाची शिल्लक कशी राहील याकडे आपलं लक्ष असतं. काही जण अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून दोन पैसे शिल्लक बाजूला ठेवत असतात. वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे गुंतवणे किंवा पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्यावर लोकांचा भर असतो. मग तुम्हीही अशी बचत करण्याच्या विचारात असाल आणि त्यासाठी तुम्हाला एक चांगली योजना किंवा स्कीम हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
देशाच्या सरकारी बँकांच्या यादीत एक नंबरवर असणारी बँक अर्थात SBI ने आरडी अर्थात आवर्ती ठेव योजना आणली आहे. या योजने अंतर्गत तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर जास्त व्याजाचा मोबदला मिळवता येईल. हा मोबदला कसा मिळवता येईल हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी ही आरडी स्कीम काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे SBIची RD स्कीम?
या स्कीम अंतर्गत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला सर्वात जास्त व्याज मिळण्याचा फायदा मिळू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अगदी 100 रुपयांपासून दरमहा गुंतवणूक करू शकता. या स्कीम अंतर्गत सर्वसामान्य व्यक्तींना 6.80 टक्के इतकं व्याज मिळू शकतं.तर जेष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 7.50 टक्के इतका असणार आहे. यातला कालावधीही सर्वसाधारणपणे 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतचा असणार आहे.म्हणजेच तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कालावधी निश्चित करता येणार आहे.आता या योजनेद्वारे किती कालावधीसाठी किती व्याजदर एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला देणार आहे यावरही एक नजर टाकूया.
किती कालावधीत किती टक्के मिळणार परतावा?
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे या आवर्ती ठेवेच्या कालावधीच्या बाबतीत काही व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत.
1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला तुमच्या ठेवीवर 6.08 टक्के व्याज मिळेल तर जेष्ठांना 7.30 टक्के व्याज मिळणार आहे.
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर सर्वसामान्यांना 7 टक्के तर जेष्ठांना 7.50 टक्के परतावा मिळणार आहे.
5 ते 10 वर्षांच्या आरडीवर 6.50 टक्के व्याज मिळणार आहे, जेष्ठांना याच कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज मिळणार आहे.
या योजनेत गुंतवणूक करताना काय घ्याल काळजी?
या योजनेत अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते.मात्र सलग सहा आठवडे आरडी खात्यात रक्कम जमा न झाल्यास खातं बंद होऊ शकतं आणि शिल्लक रक्कम खातेदाराला दिली जाऊ शकते. आरडी योजनेअंतर्गत खातेदाराला एका निश्चित तारखेला खात्यात ठरलेली रक्कम जमा करणे बंधनकारक असणार आहे. मात्र विलंबाने रक्कम जमा होत राहील्यास बँक दंड आकारू शकते, त्यामुळे तुम्हाला जमा करता येऊ शकेल अशी रक्कम आणि ती भरण्याची तारीख याबाबत सजग असणे आवश्यक आहे. आरडी स्कीम फक्त एकाच व्यक्तीच्या नावे असू शकते. उपलब्ध रकमेवर कर्जाची सुविधाही मिळू शकते. आरडीची रक्कम एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जमा करण्याची सुविधा आहे.