Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Rupee: डिजिटल रुपीचे पेमेंट UPI द्वारे करता येणार; स्टेट बँकेकडून फिचर लाँच

e Rupee by SBI

Image Source : www.theprint.in

स्टेट बँक ऑफ इंडियाने डिजिटल रुपी आणि UPI पेमेंट प्रणाली एकमेकांना जोडली आहे. त्यामुळे ई-रुपीच्या साह्याने कोणताही क्युआर कोड स्कॅन UPI पेमेंट करता येईल. डिजिटल रुपीचा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असून लवकरच सर्वांना डिजिटल चलन वापरता येईल.

Digital Rupee and UPI: देशातील आघाडीच्या बँकांना सोबत घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल रुपी प्रकल्पावर मागील वर्षापासून काम करत आहे. यामध्ये बँका, दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, आता डिजिटल रुपीचे पेमेंट UPI प्रणालीद्वारे करता येणार आहे. स्टेट बँकेने ही सुविधा ग्राहकांसाठी सुरू केली आहे.

“e Rupee by SBI” अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध 

डिजिटल रुपी म्हणजे चलनी नोटा डिजिटल स्वरुपात (ई-रुपी) ग्राहकांना खात्यात ठेवता येतील. यामुळे चलनातील कागदी नोटांचा वापर आणखी कमी होईल. स्टेट बँकेद्वारे "e Rupee by SBI" हे अ‍ॅप सुरू आहे. या अ‍ॅपद्वारे डिजिटल रुपीचे व्यवहार प्रायोगिक तत्वावर करता येतात. डिजिटल रुपीचे पेमेंट UPI प्रणालीद्वारे करण्याची सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. 

UPI क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येणार 

दरम्यान, इ रुपीचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आहे. त्यामुळे सर्व SBI ग्राहकांना e Rupee by SBI हे अ‍ॅप वापरता येत नाही. काही ठराविक राज्यातील ग्राहकांना या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, पायलट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्टेट बँकेच्या ग्राहकांना इ-रुपी वॉलेटमधून UPI प्रणालीद्वारे दुकानात, खरेदी करताना क्युआर कोट स्कॅन करून पेमेंट करता येईल. 

सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) किंवा ई -रुपी या नावाने हे चलन ओळखले जाईल. घाऊक विक्रेते, किरकोळ व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी हे चलन दोन प्रकारचे असेल. UPI आणि डिजिटल रुपी एकमेकांना जोडल्यामुळे ऑनलाइन व्यवहार आणखी वाढतील, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. पायलट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डिजिटल रुपी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होईल. 

डिजिटल पेमेंट्स मध्ये भारताची आघाडी 

भारतामध्ये UPI आधारित पेमेंट वेगाने वाढत आहे. जगभरात डिजिटल व्यवहारात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. ई-रुपी लाँच झाल्यास देशातील डिजिटल व्यवहारांची संख्या आणखी वाढेल. डिजिटल रुपी नक्की कसे काम करेल, हे या लिंकवर वाचायला मिळेल. हे चलन अधिकृत असून RBI द्वारे लाँच करण्यात येईल. मात्र, पायलट प्रकल्पामध्ये या चलनाच्या कारभारातील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. तसेच व्यवहार अचूक होत आहेत की नाही, ते पडताळून पाहिले जात आहे.