गुंतवणुकीची जुनी आणि पारंपरिक पद्धत म्हणून मुदत ठेवीकडे (Fixed Deposit Scheme) पाहिले जाते. मुदत ठेव योजना ही जोखिममुक्त असून यामध्ये निश्चित परतावा मिळवता येऊ शकतो. सरकारी आणि खासगी बँकांमध्ये ज्याप्रमाणे मुदत ठेव सुरू करता येते, अगदी त्याचप्रमाणे पोस्टात देखील मुदत ठेव योजना सुरू करता येते. या दोन्ही ठिकाणचा व्याजदर आणि गुंतवणूक कालावधी हा वेगवेगळा असतो. जर तुम्हाला देखील एकरकमी 5 लाखांची गुंतवणूक करायची असेल, तर मुदत ठेव योजना हा एक उत्तम पर्याय आहे. कुठे केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरेल जाणून घेऊयात.
गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर जाणून घ्या
स्टेस्ट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत मुदत ठेवीच्या कालावधीत गुंतवणूक करता येते. याउलट पोस्टाच्या मुदत ठेवीत 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी गुंतवणूक करता येते.
स्टेट बँकेत 5 वर्षाच्या मुदत ठेवींवरील गुंतवणुकीवर सामान्य ग्राहकांना (General Public) 6.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या गुंतवणुकीवर हा व्याजदर देण्यात येत आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना 5 वर्षासाठी मुदत ठेवींवर 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. पोस्टाचे हे व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
गुंतवणुकीचे गणित समजून घ्या
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीत (FD) 5 वर्षासाठी 5 लाखाची गुंतवणूक केली, तर सामान्य ग्राहकांच्या 6.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 6 लाख 90 हजार 210 रुपये मिळणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 7 लाख 24 हजार 974 रुपये मिळणार आहेत.
पोस्टाच्या मुदत ठेवीत 5 लाख रुपये 5 वर्षासाठी गुंतवले, तर 7.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 7 लाख 24 हजार 974 रुपये मिळणार आहेत. 2 लाख 24 हजार 974 रुपयांचे व्याज तुम्हाला या गुंतवणुकीवर मिळणार आहे.
कर सवलतीचा फायदा घेता येईल का?
पोस्टात किंवा बँकेत 5 वर्षासाठी मुदत ठेव योजनेत (FD) गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा (Tax benefit) लाभ घेता येतो. 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी कर सवलतीचा लाभ घेता येत नाही. आयकरच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपायांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा करता येऊ शकतो. 5 वर्षानंतर मुदत ठेवीमधून मिळालेली रक्कम करपात्र असते.