मित्रांनो फिरायला कुणाला आवडत नाही? जग बघायला, नवनवीन प्रदेश न्याहाळायला सगळ्यांनाच आवडतं. प्रवास केल्याने आपलं अनुभवविश्व समृध्द होतं असं म्हणतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी जाणं आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर वर्षासहलीचं नियोजन करणं हे आता कॉमन झालंय. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त मौज कशी करता येईल याकडे आपल्या सगळ्यांचा कटाक्ष असतो. तसेही भारतीय लोक बचतप्रिय आहेतच!
तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत किंवा अगदी स्वतंत्ररीत्या सोलो ट्रीपवर जायचा प्लॅन बनवत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे असं समजायला हरकत नाही. आपण कुठेही फिरायला जायचं म्हटलं की मुक्काम कुठे करायचा हा प्रश्न आलाच. एका दिवसाच्या सहलीसाठी मुक्कामचे नियोजन आपण करत नाही मात्र 2-3 दिवसांसाठी जर कुठे जायचा विचार करत असून तर हॉटेल शोधणं, त्याचे रिव्यू बघणं , तिथे सुरक्षित वातावरण आहे किंवा नाही हे तपासणं एक जिकरीचे काम बनून जाते.
ऑनलाईन असे भरपूर पोर्टल आहेत जे तुम्हांला हॉटेलचे बुकिंग करण्यास मदत करतात. मात्र अशा पोर्टलवरून केलेलं हॉटेल बुकिंग नेहमीच परवडणारे असते असे नाही. म्हणून एका महत्वाच्या आणि बचतीच्या ट्रॅव्हल हॅक बद्दल आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
?The #workation game is on amidst our headquarters!?
— 7Span (@7SpanHQ) June 14, 2023
Featuring our business mavens, enjoying amidst the Royalty of Rajasthan at @gostopsofficial??#goSTOPS #goMOREbeMORE #salesteam #workculture #funtimes pic.twitter.com/cOBmN1zXgD
तुम्ही भारतात कुठेही प्रवास करत असाल, तर मुक्कामासाठी हॉटेल बुकिंगमध्ये पैसे वाचवण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हांला काही खास पोर्टलची माहिती असणे आवश्यक आहे.
Gostops, Zostel आणि Hosteller सारखे काही पोर्टल तुम्हांला होस्टेल सुविधा देतात. तेही उत्तम गुणवत्तेसह!
होस्टेल सुविधा आहे म्हणजे तिथे अव्यवस्था असेल, सुरक्षितता नसेल असा गैरसमज करण्याची गरज नाहीये. देशभरात पर्यटनाला चालना मिळत असल्यामुळे युरोपियन देशांमध्ये सुरु असलेली होस्टेल व्यवस्था आता भारतात देखील चांगलीच रुळली आहे. याचा लाभ केवळ परदेशी नागरिक घेत नसून भारतीय पर्यटक देखील घेत आहेत.
वर्क-केशनसाठी देखील पसंती!
कोविडनंतर अनेक ऑफिसेसची काम करण्याची पद्धत देखील बदलली आहे. कर्मचाऱ्यांना कायमची घरून काम करण्याची मुभा काही ऑफिसेसने दिली आहे. तसेच काही युवक फ्रीलान्सिंग काम देखील करतात.
Work From Home आणि Freelancing करणाऱ्या युवावर्गात वर्क-केशनची (work-cation) क्रेझ आहे. म्हणजेच पर्यटनाच्या ठिकाणी काम करण्याची पद्धत अलीकडच्या काळात विकसित होते आहे. अशा नागरिकांसाठी फ्री वायफाय, टेबल, खुर्ची, स्वतंत्र डेस्क देखील Gostops, Zostel आणि Hosteller तर्फे पुरवले जातात. पर्यायाने कमी दरात म्हणजेच 500 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत यासाठी दिवसाला खर्च येतो. नेहमीच्या बुकिंग पोर्टलशी तुलना करता तुमचे 60-50% पैसे यातून नक्कीच वाचू शकतात.