देशोविदेशातून, प्रामुख्याने आशिया खंडातून अनेक नागरिक दरवर्षी सौदी अरेबियात रोजगाराच्या शोधात जात असतात. उत्तम पगार आणि चांगले लाइफस्टाइल जगता यावे म्हणून विकासनशील देशांचा सौदीकडे जस्त ओढा असतो. तुम्ही किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक जर सौदीला रोजगाराच्या निमित्ताने जाण्याचा विचार करत असतील तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे.सौदी अरेबिया सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काही नवे नियम केले आहेत.
Table of contents [Show]
कामगारांचे संरक्षण मुख्य मुद्दा
देशातील कर्मचारी, कामगार हे देशांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय होणे गरजेचे आहे आहे तेथील सरकारचे म्हणणे आहे. सौदीला जाणाऱ्या कामगारांच्या संरक्षणासाठी आणि कामगारांच्या रोजगारात सुधारणा करण्यासाठी तेथील सरकारने काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
काय आहेत नवे नियम?
नव्या नियमानुसार घरगुती कामगारांसाठी (Domestic Workers) किमान वय 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. 21 वर्षे वयाखालील कामगारांना कामासाठी ठेवण्यास सक्त मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार कामगारांना वेळेत देण्याची ताकीद देखील सरकारने दिली आहे. कामगारांचे पगार प्राधान्याने केले जावेत असे सरकारचे म्हणणे आहे.
याशिवाय कामगारांना साप्ताहिक सुट्टी देण्याचा आदेश देखील सरकारने दिला आहे. तसेच दिवसाला किती तास काम केले पाहिजे याबद्दलही सौदी सरकारने नियम बनवला आहे. दिवसाला 10 तासांपेक्षा अधिक काम कर्मचाऱ्यांकडून करून घेता येणार नाही असे नव्या कायद्यात म्हटले आहे.
कंपन्यांना निर्देश
ज्या कंपन्यांनी कामगारांना जॉब दिला आहे, त्या कंपन्यांनी त्यांच्या ऑफर लेटरमध्ये कामाचे तास, कामाचे स्वरूप, साप्ताहिक सुट्टी आदी माहिती नमूद करणे गरजेचे आहे असे सौदी सरकारने म्हटले आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पासपोर्ट ठेऊन घेता येणार नाही असेही सुधारित कायद्यात म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे नियोक्त्याला कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी लागेल असे देखील यात म्हटले आहे.
प्राप्त झाल्या होत्या तक्रारी
भारत, पाकिस्तान, नेपाळ व इतर आशियाई देशांमधून कामाच्या शोधात गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत दुर्व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सौदी सरकारला प्राप्त झाल्या होत्या. भारतातून सौदीमध्ये घरकाम करण्यासाठी गेलेल्या मायलेकींची नुकतीच सुटका करण्यात आली आहे. कामगारांना मारहाण करणे, जेवण न देणे, वेळेवर पगार न देणे अशा तक्रारी समोर आल्या होत्या. समाजमाध्यमांवर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या सर्व पार्श्वभूमीवर सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय सौदी सरकारने कामगारांसाठी देखील काही नियम आखून दिले आहेत. कामगारांना देशातील कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे तसेच इस्लामी संस्कृतीचा आदर करणे देखील बंधनकारक असल्याचे सौदी सरकारने म्हटले आहे.