सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराला आयकर विभागाकडून 175 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराला आयकर विभागाने सूट दिली आहे. आयकर विभागाने गेल्या तीन वर्षांत लागू केलेल्या आयकरातून 175 कोटी रूपयांची सूट दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही सूट देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Table of contents [Show]
आयकर विभागाने बजावली होती नोटीस
एका अधिकृत निवेदनानुसार, 2015-16 या वर्षातील कराची मोजणी करताना आयकर विभागाने श्री साईबाबा संस्थान हे धार्मिक ट्रस्ट नसून ते धर्मादाय ट्रस्ट असल्याचे मान्य केले. दानपेटीत मिळणाऱ्या देणग्यांवर 30 टक्के प्राप्तिकर लावण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 183 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस जारी करण्यात आली होती.
कोर्टाच्या आदेशानंतर आयकर विभागाने दिली सूट
त्यानंतर साईबाबा संस्थानने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करुन कराचा निर्णय होईपर्यंत नोटीशीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. अखेर आयकर विभागाने श्री साईबाबा संस्थानला धार्मिक आणि धर्मादाय न्यास म्हणून स्विकारले आणि दानपेट्यांवरील करातून सूट दिली. अशाप्रकारे श्री साईबाबा संस्थानला गेल्या तीन वर्षांत लागू करण्यात आलेल्या 175 कोटी रुपयांच्या आयकरातून सूट देण्यात आली आहे.
साईबाबा संस्थान, शिर्डी (Shri Saibaba Sansthan Trust)
साईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरवणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 13 फेब्रुवारी 1922 रोजी अहमदनगरच्या सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली.
साईबाबा मंदिराविषयी
15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी समाधी घेतली. साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तानी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले. दररोज सुमारे 8 हजार ते 12 हजार भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात. दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे.
साईभक्तांकडून मिळणारी देणगी हे संस्थानाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पहिल्या वर्षी म्हणजे इ.स. 1922 साली रामनवमीला संस्थानला 773 रुपये 60 पैसे देणगी मिळाली होती. तर 2012 साली रामनवमीला 3 कोटी 9 लाख 37 हजार रोख रक्कम, 696 ग्रॅम सोनं, पावणेतीन किलो चांदी संस्थानकडे साईभक्तांकडून जमा झाली. जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे साईबाबा संस्थानची झोळी भरली आहे. त्यामुळे हे संस्थान करोडपती बनले आहे. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात. आज बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत. 1923 साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ 1,445 रुपये 7 आणे व 6 पैसे होते. 2015 साली, 15 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे 1,483 कोटी रुपये ठेवीच्या स्वरुपात होते. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी 99 कोटी रुपये मिळाले. संस्थानची स्थावर मालमत्ता 2015 मध्ये पाचशे कोटींच्या वर होती. याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास 380 किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत.
करोनानंतर वर्षभरातील उत्पन्न (Trust Income In Pandemic)
साई ट्रस्ट शिर्डीच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी कोरोनानंतरच्या श्री साई मंदिराच्या कोरोना नंतरच्या 1 वर्षातील दानाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या अटी शिथिल झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2021 मध्ये शिर्डीचे साईबाबा मंदिर भक्तांसाठी पुन्हा सुरु झाले. तेव्हापासून नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या 13 महिन्यांच्या कालावधित जवळपास अडीच ते तीन करोड भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या भक्तांकडून या काळात जवळपास 398 करोड रुपयांहून अधिक दान प्राप्त झाले आहे. यामध्ये हुंडीमध्ये 168 करोड रुपये, काउंटरवर 77 करोड रुपये तर 114.50 करोड रुपये बाबांच्या चरणी भक्तांनी अर्पण केले आहेत.
असा होतो दानाचा वापर (Donation Amount Use)
करोडोंमध्ये मिळणाऱ्या दानाचा वापर कसा होतो हे सांगताना भाग्यश्री बानायत पुढे म्हणाल्या की, या दानाचा सर्वात पहिला वापर भाविकांसाठी केला जातो. साईदान प्रसादालय, साईबाबा ट्रस्टकडून चालविण्यात येणारी हॉस्पीटल्स, शाळा, महाविद्यालयं तसेच अन्य लोकोपयोगी कामांसाठी दानातील रक्कम खर्च करण्यात येते.