India Crude Oil Import From Russia: रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था अस्थिर झाल्या आहेत. अद्यापही हे युद्ध सुरूच आहे. दरम्यान, या युद्धात भारताला एक फायदा झाला. रशियाची आर्थिक नाकेबंदी होत असताना भारताला मात्र, रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळाले. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी रशियाच्या क्रूड ऑइलवर निर्बंध घातले. त्यामुळे जागतिक दरापेक्षा भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळाले. मात्र, आता तेलावरील ही सूट लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
प्रति बॅरल 5 डॉलरने डिस्काउंट कमी होणार
जागतिक बाजारात तेलाचे जे दर आहेत त्यापेक्षा कमी दराने भारताला रशियाकडून कच्चे तेल मिळते. प्रति बॅरल 25 डॉलर इतका डिस्काउंटही मिळत होता. मात्र, आता हा डिस्काउंट 5 डॉलरने कमी करण्याचा विचार रशिया करत आहे. त्यामुळे येत्या काळात भारताला 5 डॉलरने कच्चे तेल रशियाकडून महाग मिळेल. या घडामोडींचा स्थानिक बाजारावर परिणाम होऊ शकतो.
भारतीयांना इंधनदरवाढीचा फटका बसणार का?
मागील अनेक महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आता दर स्थिर आहेत. मात्र, कच्च्या तेलाची आयात महागल्यास इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात बसू शकतो. इंधन निर्यातीवरील सूट कमी करणार असल्याचे सूतोवाच रशियाचे अर्थमंत्री अँटॉन सिलूनोव्ह यांनी दिले आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने प्रति लिटर इंधनाचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.
प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर?
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106.31 रुपये असून डिझेलचा दर 106.31 प्रति लिटर आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमधील पेट्रोलचा दर 102.63 रुपये असून डिझेलचा दर 94.24 रुपये आहे.
बंगळुरू शहरात पेट्रोलचा दर 101.94 रुपये असून डिझेलचा दर 87.89 रुपये आहे.
युरोपियन युनियनने रशियाच्या कच्च्या तेल आयातीवर निर्बंध घातले आहेत. तर इतर काही देशांनी 60 डॉलर प्रति बॅरल इतके किंमतीवर बंधन घातले आहे. यास "प्राइस कॅप" असे म्हणतात. या कॅपमुळे रशिया जास्त दराने तेल विकू शकत नाही. युक्रेनमुळे अडचणीत सापडल्याने रशियाने भारताला कमी दरात तेल निर्यात सुरू केली होती. ती अजूनही सुरू आहे. मात्र, आता ही सूट कमी होण्याची शक्यता आहे.
रशियाकडून स्वस्तात तेल मिळत असल्याने भारताने मध्य पूर्वीतील देशांकडून होणारी तेल आयात कमी केली होती. मात्र, आता पुन्हा आखाती देशांकडून तेल आयात वाढवण्याचा विचार भारत करत आहे.